पालकमंत्र्यांचा तिढा सुटेना, आता भाजपमध्ये नाशिक जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या लटकल्या, मुंबईसह 22 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या

‘शिस्तीचा पक्ष’ आणि ‘दी पार्टी वुईथ डिफरन्स’ असे स्वतःचे वर्णन करणाऱया भाजपला बेशिस्तीची लागण झाल्याचे जिल्हाध्यक्षांच्या निवडीवरून दिसून आले आहे. नाशिक पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांमुळे महायुतीमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यात आता भाजपच्या नाशिक जिल्हाध्यक्षांच्या वादाची भर पडली आहे.

राज्यातील भाजपच्या 80 जिह्यांपैकी 58 जिल्हाध्यक्षांची नावे आज जाहीर करण्यात आली. मात्र आमदारांमधील वाद आणि वर्चस्वाच्या लढाईमुळे तब्बल 22 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. कोकणातील 12 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. 2 जिल्हाध्यक्षांवरून वाद सुरू आहे. त्यामुळे 2 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली आहे.

विदर्भातही वादाची ठिणगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावाखाली असलेल्या विदर्भातून एकूण 15 जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. येथे एकूण 19 जिल्हे आहेत. वादामुळे 4 ठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत.

पश्चिम महाराष्ट्रात धुसफुस

पश्चिम महाराष्ट्रात एकूण 13 जिल्हे आहेत. येथे 11 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 2 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली आहे, तर 4 जणांना पुन्हा अध्यक्ष करण्यात आल्याने पक्षात धुसफुस आहे.

मुंबईतही अंतर्गत वाद

मुंबईत अंतर्गत वादामुळे दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि उत्तर-पश्चिम मुंबईच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती रखडली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि आमदारांमध्ये प्रचंड मतभेद असल्याने मुंबईतील सहा जिह्याध्यक्षांपैकी तीन जणांच्या नावावर अंतर्गत वाद सुरू आहे.

  • मराठवाडय़ात भाजपचे एकूण 15 जिल्हे आहेत. यातील 8 जिल्हाप्रमुखांची घोषणा करण्यात आली, तर 7 नियुक्त्या अडकल्या आहेत. तीन जिल्हाध्यक्षांना पक्षाने आणखी एक संधी दिली आहे.

Comments are closed.