भाजपा ही राममंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी; परभणी, धाराशीवमध्ये गद्दारांविरोधात उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला

राममंदिरासाठी काय काय नाही केले, घराघरातून पैसे गोळा केले. शिळा गोळा केल्या. मंदिर वहीं बनाएंगेंचे नारे दिले. कशासाठी? तुम्हाला मंदिर उभारायचे नव्हते, तर लुटालुटीचे दुकान सुरू करायचे होते. ही नवी भाजपा आहे. राममंदिर लुटणारी बाबर जनता पार्टी! त्या बाबराने आधीचं राममंदिर पाडलं, या बाबराने हे मंदिर लुटलंय. मंदिर लुटणारी बाबराचीच औलाद ही. अन् या बाबराची दाढी कुरवाळायला गेलीय गँग ऑफ गद्दार, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला. आपली मशाल ही फक्त निशाणीपुरती नाही. महाराष्ट्राला लागलेली गद्दारीची कीड बेचिराख करण्यासाठी या मशाली धगधगल्या पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे

धाराशीव येथे भरसभेत मोबाईल दाखवला होता या गद्दाराने. मी फोन केला तर उचलला नाही. हाच म्हणत होता, दादानो, खंडोजी खोपडे कोण… समोरून उत्तर यायचे गद्दार… सूर्याजी पिसाळ कोण… गद्दार! चारशे वर्षांत यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला नाही, तुझ्या कधी पुसणार? तिकडे बंडू, इकडे ओम. आम्ही वाघ समजत होतो. पण वाघाचे कातडे पांघरलेले हे लांडगे निघाले. आता जे कानावर येत आहे ते सगळे भयंकर आहे. हे आधी कळले असते तर उमेदवारीच दिली नसती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. ज्या मतदारांनी, शिवसैनिकांनी या गद्दारांना रक्ताचे पाणी करून निवडून आणले त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कालपासून विदर्भ, मराठवाडय़ाच्या दौऱयावर आहेत. शनिवारी यवतमाळ, वाशीम आणि हिंगोलीत गद्दारांचा समाचार घेऊन शिवसेनेचे वादळ आज परभणी, धाराशीवमध्ये दाखल झाले. रस्त्यात, चौकात, गावागावांत उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले. निष्ठावंतांच्या गर्दीपुढे सभागृहही कमी पडले. सभागृहाबाहेरही तुडुंब गर्दी झाली होती. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, अंबादास दानवे, आमदार डॉ. राहुल पाटील, कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, महापौर सय्यद इक्बाल, माजी आमदार मीरा रेंगे, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, मकरंद राजेनिंबाळकर, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे आदींची उपस्थिती होती.

निष्ठावंतांची झालेली तुडुंब गर्दी पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, हे प्रेम, ही निष्ठा… ही शिवसेनाप्रमुखांची पुण्याई आहे. या सभा नाहीतच, मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला आलोय. परभणी, धाराशीवकरांचे आभार मानायचेत. परभणीकरांनी महापौर दिला शिवसेनेचा, पण दुर्दैवाने इतिहासाची पुनरावृत्ती झाली. शिवसैनिक, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्त आटवून ज्यांना निवडून आणले तेच गद्दार झाले. परभणीत महापौर मुस्लिम दिला म्हणून आमच्यावर टीका… बाळासाहेबांचे विचार सोडले… आता स्थानिक स्वराज्याला तुम्ही कोण उमेदवार दिला? या उमेदवारावर किती गुन्हे आहेत, तुरुंगात होता जरा माहिती काढा… आपला महापौर, एका महाराजांच्या कीर्तनासाठी शेतातले पीक काढून जागा देणारा! तुम्ही जे केलेत ना, तो बाळासाहेबांच्या विचारांचा घात आहे.

जनाची नाहीतर मनाची तरी वाटू द्या

लोकसभेच्या वेळी मी प्रचाराला आलो होतो. त्यावेळी पाऊस चालू होता. भरपावसात जंगी सभा झाली. एका बाजूला राहुल पाटील, दुसऱ्या बाजूला… मी दोघांचे हात उंचावले. एकाने अजूनही हात पकडून ठेवला आहे, हे महाशय हात सोडून विमानात बसले, बदाम खात! इथे शेतकरी उपाशी आहे अन् हे सारे गाढव विमानातून गेले. त्या प्रवासाचे व्हिडीओही टाकले, केवढा हा बेशरमपणा! त्यात तो दलाल पण दिसतोय. ज्याने या गद्दारांची खरेदी-विक्री केली. नाक्यावर उभा राहणारा तो दलाल, अरे जनाची नाहीतर निदान मनाची तरी लाज वाटू द्या! पण लाज, शरम सगळे गुंडाळून ठेवलेय! खासगी विमानातून जाण्यासाठी लागणारा पैसा यांच्याकडे आला कुठून? अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागताच उपस्थितांतून ‘खोक्यातून, खोक्यातून’ असा पुकारा झाला.

लोक सोडून का जात आहेत, उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असा शहाजोग सल्ला मला देतात. आत्मपरीक्षण सर्वांनीच केले पाहिजे. आमच्या पक्षफुटीचे प्रकरण चार वर्षांपासून रखडले आहे. त्याचेही आत्मपरीक्षण झाले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

तर सहाही गद्दार अपात्र ठरले पाहिजेत

लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नव्हे. जनता, मतदार म्हणजे पक्ष. दोन तृतीयांश सभासद उडी मारून तिकडे गेले तर त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकत नाही. जेव्हा एक पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याला दोन तृतीयांश पाठिंब्याची गरज असते. त्यामुळे या देशात कायद्याचे राज्य असेल तर हे सहाही गद्दार बादच काय अपात्र ठरले पाहिजेत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

गद्दारावर आसूड चालवा

वर्षभरापूर्वी मराठवाड्यात अतिवृष्टीने हाहाकार उडाला होता. मी आलो होतो. तेव्हा परभणीचा हा गद्दार गायब होता. मी शेतकऱयाच्या बांधावर गेलो होतो. शेतकऱयाला कर्जमुक्त करण्याची मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं असं हा म्हणतोय… लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी वेळीच माझ्या लक्षात आल्या असत्या. माझी चूक झाली. हा जो आसूड तुम्ही मला दिला आहे त्याचा उपयोग तुम्ही करायचा आहे. गद्दारावर तो चालवायचा! दिसला गद्दार की त्याला जाब विचारा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आज शिर्डीत झंझावाती सभा

ईशान्य मुंबई, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी आणि धाराशीव नंतर उद्धव ठाकरे उद्या, 29 जून रोजी शिर्डी येथे मतदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेशी गद्दारी करणाऱया खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात याविषयी उत्सुकता आहे.

धाराशीवमध्ये निष्ठावंतांचे तुफान

धाराशीव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी उसळली. या गर्दीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, निष्ठावंतांचा मला अभिमान वाटतो. 2022 मध्ये कैलास पाटील गुजरातच्या सीमेवरून परत आला होता. अरविंद सावंत केंद्रात मंत्री होते. एका क्षणात राजीनामा दिला. 2014 मध्ये अनिल देसाईंना मंत्री होण्याची संधी होती. पण नाही गेले. संजय राऊतांच्या तर नादीच लागत नाहीत. खोक्यांच्या राशी ठोकरणारे हे अस्सल निष्ठावंत! जिवाला जीव देणारी माणसं मिळायलाही भाग्य लागते. विकास निधी मिळत नाही म्हणून हे गद्दार तिकडे पळाले. छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. विकास निधी मिळाला नाही म्हणून मी औरंगजेबाकडे जातो असे ते म्हणाले असते तर आपण जिवंत तरी राहिलो असतो का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. हे सगळे स्वार्थासाठी गेलेत, स्वतःच्या खासगी निधीसाठी गेलेत, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

समाधानच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशीच पाटसांगवीत समाधान पाटील या शिवसैनिकाचा मिंध्यांच्या कार्यकर्त्यांनी खून केला. आता हा त्याच मिंध्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. त्याने समाधानच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले… पण मी सोडणार नाही. सभा संपली की समाधानच्या कुटुंबाला भेटणार आहे. त्यांना आम्ही आधार देऊ, अशी ग्वाहीच यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.

मला माणूस महत्त्वाचा…

खासदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी वाशीमच्या खासदाराने मुलीच्या सोयरिकीचे कारण सांगितले. हिंगोलीचा खासदार म्हणाला पोराची निवडणूक आहे. शिर्डीचे म्हणाले पत्नी आजारी आहे. हा म्हणाला, मुलगा आजारी आहे. त्याचा चेहरा बघूनच मला शंका आली की याच्या मनात पाप आहे. मीच मध्यरात्री कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईला पाठवले होते. ‘त्यांना खासदार पाहिजे, मला ओमराजे पाहिजे’ असा निरोप मी दिला होता. मला माणूस महत्त्वाचा आहे, पण हा त्या लायकीचा निघाला नाही’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला येणार

आमदार कैलास पाटील यांनी प्रास्ताविकात येत्या महिनाभरात शेतकऱयांच्या मागण्यांसाठी मोठे आंदोलन करणार असल्याचे जाहीर करून त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येण्याची विनंती केली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांच्या आंदोलनाला येणार असा शब्दच दिला. शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न मोठा आहे. शेतीची वाट लावून कसला विकास करताय, असा सवाल करतानाच त्यांनी या सरकारला कॉन्ट्रक्टर महत्त्वाचे असल्याचा टोला लगावला.

जिल्हाप्रमुख विष्णु मुरकुटे, रवींद्र धर्मे, महिला आघाडीच्या अयोध्या पोळ, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, साहेबराव कल्याणकर, तालुकाप्रमुख नंदू अवचार, छगन मोरे, शिवलिंग बोधणे, शिक्षक सेनेचे बाळासाहेब राखे, दिनेश बोबडे, जिल्हाप्रमुख रणजित पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, शंकर बोरकर, पक्ष निरीक्षक सुनील पाटील, अनंत पताडे, महिला आघाडीच्या शामल वडणे, झीनत सय्यद आदींची उपस्थिती होती.

भाजपाला महाराष्ट्र धर्म संपवायचाय

अयोध्येच्या लढय़ात शिवसेनाप्रमुखांचे योगदान मोठे आहे. ते फिरले म्हणूनच आज हे दिसताहेत. पण सत्तेच्या असुरी महत्त्वाकांक्षेपुढे यांना काहीच दिसत नाही. का फोडताय शिवसेना? यांना महाराष्ट्र धर्म संपवायचाय! छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेली मराठीची अस्मिता संपवायचीय! सगळे गुजरातला न्यायचेय. धाराशिवमध्ये किती कारखाने आले? पवनराजे मल्टिस्टेट, तेरणाचे भंगार आणखी काय काय कानावर येत आहे. कुंभमेळ्याचेही असेच आहे. सगळा गोलमाल झाकण्यासाठी शिवसेना, ठाकरे संपवायचे. पण ना शिवसेना संपणार, ना ठाकरे असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मोदींच्या चेहऱ्यावर 18 खासदार निवडून आले असा कल्ला करत होते. या निवडणुकीत नऊ खासदार शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांच्या चेहऱ्यावर निवडून आले. ही समोर बसलीय ती शिवसेना आहे, ती संपत नसते. त्यासाठी ‘मन की बात’ नव्हे तर ‘दिल की बात’ करावी लागते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments are closed.