भाजपचे बेगडी हिंदुत्व! बाबा परूळेकर यांची अरेरावी, पतितपावन मंदिरात भजन करण्यास भजनीबुवांना रोखलं

रत्नागिरीतील पतितपावन मंदिरात भजनासाठी गेलेल्या वयोवृद्ध भजनीबुवांना भाजपचे नेते ॲड. बाबा परूळेकर यांनी मंदिरात प्रवेश नाकारत भजन करण्यास रोखले. अखेर संतापलेल्या भजनी कलाकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ॲड. बाबा परूळेकर यांच्याविरोधात लेखी तक्रार केली असून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

दर शिवरात्रीला पतितपावन मंदिरात बहुजन समाजाच्यावतीने भजन आयोजित करण्यात येणार असल्याचे आगाऊ पत्र पतितपावन मंदिर व्यवस्थापनाकडे देण्यात आले होते. 26 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता सुरेंद्र घुडे, संजय मेस्त्री, कौस्तुभ नागवेकर, सुदेश नागवेकर, मनोज भाटकर, जयवंत बोरकर हे भजनीबुवा हार्मोनियम, टाळ, मृदुंग आणि पखवाज घेऊन भजनासाठी पतितपावन मंदिरात गेले होते. त्यावेळी भाजपचे नेते ॲड. प्रदीप उर्फ बाबा परूळेकर यांनी भजनीबुवांना मंदिरात प्रवेश करण्यास अटकाव करत इथे भजन करायचे नाही हे मंदिर आमचे आहे, असे सांगितल्याची तक्रार भजनीबुवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सुरेंद्र घुडे, संजय मेस्त्री, कौस्तुभ नागवेकर, सुदेश नागवेकर, विजय बिर्जे, साईनाथ नागवेकर या भजनीबुवांनी लेखी तक्रार केली आहे.

भजनीबुवांना पतितपावन मंदिरात भजन करण्यास रोखल्याने समजताच रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, सुरेश शेट्ये आणि अन्य नागरिक पतितपावन मंदिरात पोहचले. त्यांनी खडसावून सांगितले की, हे मंदिर भागोजीशेठ कीर यांनी सर्व जाती मधील लोकांसाठी बांधले आहे, त्यामुळे तुम्ही नियम बदलू शकत नाही. त्यानंतर भजनीबुवांनी पतितपावन मंदिरात भजन केले.

दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चातून जागा विकत घेऊन हिंदू धर्मातील सर्व जातीच्या लोकांसाठी देशातील पहिले मंदिर उभारले. स्पृश्य-अस्पृश्यच्या भिंती गाढून टाकण्यासाठी त्यांनी हे पतितपावन मंदिर उभारत सहभोजन सुरू केले होते. मात्र त्याच मंदिरात बहुजन समाजातील भजनीबुवांना प्रवेश नाकारल्याने संताप व्यक्त होत आहे. “मी 86 वर्षांचा आहे. माझ्या 63 वर्षाच्या भजन सेवेत मंदिरातून भजनीबुवांना बाहेर जा सांगण्याची पहिलीच वेळ आहे”, अशी खंत यावेळी जयवंत बोरकर बुवा यांनी व्यक्त केली

Comments are closed.