ताडोबा सफारीत भाजप आमदाराकडून नियमांचे उल्लंघन; मोबाईल बंदी असतानाही शूट केली ‘रील’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघाचे भाजप आमदार करण देवतळे यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ताडोबाच्या ‘कोअर’ आणि ‘बफर’ क्षेत्रात सफारी करताना मोबाईल सोबत बाळगणे नियमबाह्य आहे; तसेच नियम मोडल्यास 5 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. असे असतानाही, आमदार देवतळे यांनी चक्क ‘रील्स’ तयार करून सोशल मीडियावर शेअर केली. हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना मोबाईलचे प्रतिबिंब जीपच्या आरशात कैद झाले, ज्यामुळे त्यांनी सफारी दरम्यान मोबाईल वापरल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार देवतळे यांनी ताडोबा बफरमधील ‘निमढेला’ गेटवरून सपत्नीक सफारी केली, मात्र यादरम्यान त्यांनी नियमांचे उल्लंघन केले. सर्वसामान्य पर्यटकांना काटेकोर नियम लागू करणारे ताडोबा प्रशासन आता आमदार महोदयांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आणि पर्यटनाचा दर्जा टिकवण्यासाठी सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरण्यावर व नेण्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे.

Comments are closed.