मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी! नरेंद्र मेहता यांनी गरळ ओकले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पर्युषण काळात स्वतःच्या मालकीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कंदमुळांच्या भाज्यांवर बंदी घालणारे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मीरा भाईंदर ही जैनांची नगरी आहे, मिनी राजस्थान आहे असे गरळ मेहता यांनी ओकले. त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद मीरा-भाईंदरमध्ये उमटले. मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आहे, असे म्हणणाऱ्या मेहतांविरोधात स्थानिक भूमिपुत्रांसह विविध संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दर्शन सागर सन्मान 2026 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजपचे मीरा-भाईंदरमधील आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मेहता म्हणाले की, साधुसंतांमुळे आम्हाला जीवनात चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. मी अशा मीरा-भाईंदर नगरीतून आलोय की त्यास ‘मिनी राजस्थान’ तसेच ‘जैनांची नगरी’ असेही म्हटले जाते.

माफी अखेर मागितली

नरेंद्र मेहता यांच्या वक्तव्याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होताच त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली. ते म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असून कुणाचाही अनादर करण्याचा हेतू नव्हता. या शहराच्या विकासात सर्वांचे योगदान असून माझ्या वक्तव्यामुळे कुणाचे मन दुखावत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

महाराष्ट्रात हे लाड सहन करणार नाही

मेहता यांच्या वक्तव्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून विविध मराठीप्रेमी संघटना व पक्षांनी निषेध केला आहे. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, मेहता यांनी यापूर्वीही मराठी, गुजराती आणि मारवाडी समाजामध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्ये केली आहेत. मीरा-भाईंदर हे आगरी-कोळी आणि मराठी माणसांचे शहर असून तुम्ही उपरे आहात. महाराष्ट्रात हे लाड कदापिही सहन केले जाणार नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

Comments are closed.