डिंपल यादवच्या समर्थनार्थ भाजपचे खासदार निषेध
मशिदीतील सप बैठकीचा मुद्दा : मौलाना साजिद रशिदींकडून आक्षेपार्ह टिप्पणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसद परिसरात सोमवारी एक वेगळे दृश्य दिसून आले. रालोआचे अनेक खासदार हे समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्या सन्मानार्थ घोषणाबाजी करत होते तसेच डिंपल यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मौलाना साजिद रशिदींच्या विरोधात निदर्शने करत होते.
सप खासदार डिंपल यादव या एका मशिदीत डोक्यावर पदर न घेता गेल्याने मौलाना साजिद रशिदींनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याच्या विरोधात समाजवादी पक्षाच्या कुठल्याही नेत्याने संताप व्यक्त केला नाही, परंतु समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी असलेल्या डिंपल यांच्या सन्मानार्थ रालोआचे खासदार सरसावले. अखिलेश यादव आणि सपचे अन्य नेते मौलाना रशिदींच्या या आक्षेपार्ह टिप्पणीवर मौन का बाळगून आहेत असा प्रश्न रालोआ खासदारांनी उपस्थित केला आहे.
मौलाना रशिदी यांनी डिंपल यादव यांच्या मशिदीतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच डिंपल यादव यांच्या पेहरावावरून त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वक्तव्याचा आधार घेत रालोआच्या खासदारांनी सोमवारी निदर्शने केली. तर मौलाना साजिद रशिदी हे अद्याप स्वत:च्या वक्तव्यावर ठाम आहेत.
तर रालोआ खासदारांच्या निदर्शनांची दखल डिंपल यादव यांनी घेतली आहे. रालोआच्या खासदारांनी मणिपूरमधील घटनेचा विरोध केला असता तर चांगले ठरले असते. मणिपूरच्या महिलांची पाठराखण त्यांनी करणे अपेक्षित होते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान ज्याप्रकारे भाजप नेत्यांनी आमच्या सैन्याधिकाऱ्यांबद्दल वक्तव्यं केली, त्याच्या विरोधात या खासदारांनी निदर्शने करणे गरजेचे होते असे डिंपल यादव यांनी म्हटले आहे.
तर सप खासदार इकरा हसन यांनी एका महिला लोकप्रतिनिधीबद्दल रशिदी यांनी केलेली टिप्पणी लाजिरवाणी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशाप्रकारची टिप्पणी करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जावी. तसेच त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जावा. ते कुठलेही धर्मगुरु नाहीत, तसेच कुठल्याही धर्माचे ठेकेदार नाहीत असे इकरा हसन यांनी म्हटले आहे.
मौलाना रशिदी विरोधात गुन्हा
सप नेते प्रवेश यादव यांनी लखनौ येथील गोमतीनगर पोलीस स्थानकात मौलाना साजिद रशिदी विरोधात तक्रार नोंदविली आहे. तर दुसरीकडे सपचे वरिष्ठ नेते मात्र मौलाना रशिदी यांच्या वक्तव्याबद्दल मौन बाळगून असल्याचे चित्र दिसुन आले आहे.
Comments are closed.