भाजपने आता त्याच धोरणाचा पुन्हा अध्यादेश काढला! 24 तास मॉल, हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्णयावरून आदित्य ठाकरे यांचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. मुंबईसह राज्यातील दुकाने, मॉल, हॉटेल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि मनोरंजनाची व करमणुकीची ठिकाणे चोवीस तास खुली ठेवण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडली होती. ज्याचा आदेश आता महायुती सरकारने काढला आहे. यावरूनच आता आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला टोला लागलेला आहे.

X वर एक पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “हे मजेशीर आहे, ज्या भाजपने माझ्या ‘मुंबई 24/7’ धोरणावर संस्कृती आणि सुरक्षिततेच्या कारणावरून पातळी सोडून टीका केली होती, त्याच भाजपने आता त्याच धोरणाचा अध्यादेश पुन्हा काढला आहे. त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं आणि आजही पुन्हा तेच विचारतोय, कष्टकरी मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत जेवणाखाणाची, थोडा निवांत आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात नक्की काय अडचण आहे?”

ते म्हणाले, “मुंबई कष्टकऱ्यांचं शहर आहे आणि हे शहर 24/7 धावतच राहतं. जानेवारी २०२० पासूनच हे धोरण अस्तित्वात आहे आणि तेव्हा भाजप नेत्यांनी ह्यावर आक्षेप घेतला होता. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील याविषयीचे वर्तमानपत्रातील वार्तांकनही सोबत दिले आहे. नवा अध्यादेश काढण्याची काही गरजच नव्हती. पण भाजपला आता आपलं मत बदलण्यास नेमकं काय कारणीभूत ठरलं?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed.