भाजप आणखी किती वर्षे सत्ता गाजवणार? आघाडीच्या तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

भाजपच्या राजवटीचा अंदाज: भारतीय जनता पक्ष (BJP) देशाच्या सत्तेतून कधी बाहेर होणार? भाजप आणखी किती वर्षे देशावर राज्य करणार? यावर देशातील आघाडीचे राजकीय विश्लेषक आणि ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’चे (Axis My India) संस्थापक प्रदीप गुप्ता यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत केंद्र सरकारच्या कामगिरीत मोठी घसरण होत नाही, तोपर्यंत भाजप देशाच्या सत्तेत कायम राहू शकते. देशातील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने त्यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.

भारतातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या सहकारी पक्षांची सरकारे आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपने दमदार कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप गुप्ता यांनी भाजपच्या भविष्यातील सत्तेबाबत महत्त्वपूर्ण तर्क मांडले आहेत.

Indian Politics Cycle : भारतीय राजकारणात पुन्हा ‘एकपक्षीय वर्चस्वाचा’ काळ

प्रदीप गुप्ता यांनी काँग्रेसच्या प्रदीर्घ सत्ताकाळाचे उदाहरण देत सांगितले की, भारतीय राजकारण सध्या पुन्हा एकदा ‘वन-पार्टी प्री-डॉमिनन्स’ म्हणजेच एकपक्षीय वर्चस्वाच्या कालखंडातून जात आहे. स्वातंत्र्यानंतर देशात जसे काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते, तशीच काहीशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. राजकारणात एक ठरावीक चक्र असते आणि सध्या ते भाजपच्या बाजूने फिरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

BJP Ruling Years : भाजप किमान 20 वर्षे सत्तेत राहण्याचा अंदाज

भाजप पुढची किती वर्षे सत्तेत राहू शकते, याचे गणित मांडताना प्रदीप गुप्ता म्हणाले, “2014 पासून देशाच्या सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाचे (BJP) राजकीय वर्चस्व देशात किमान 20 वर्षे कायम राहू शकते.” तामिळनाडू निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाच्या विजयाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या गुप्ता यांनी सांगितले की, जोपर्यंत सत्ताधारी पक्षाची कामगिरी खालावत नाही, तोपर्यंत त्यांची स्थिती मजबूतच राहील.

Congress Era Example : काँग्रेसच्या 20 वर्षांच्या राजकीय चक्राचा दाखला

आपल्या दाव्याचे समर्थन करताना गुप्ता यांनी काँग्रेसचा इतिहास समोर ठेवला. ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष 1977 पर्यंत देशात सलग सत्तेवर होता, त्यानंतर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्या काळात आपण साधारणपणे 20 वर्षांच्या राजकीय पिढीबद्दल (Political Generation) बोलायचो. हा 20 वर्षांचा चक्राकार काळ आजही लागू पडतो.” म्हणजेच भाजप आगामी अनेक वर्षे भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

BJP Governance Performance : भाजपला आता करावी लागणार ‘सुपर कामगिरी’

प्रदीप गुप्ता यांच्या मते, सत्ताधारी आघाडी आणि विरोधक या दोघांचेही भविष्य सध्याच्या सरकारच्या कामगिरीवर (Performance) अवलंबून असणार आहे. देशाला एवढा मोठा जनादेश मिळाल्यामुळे जनतेच्या भाजपकडून असणाऱ्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे आता भाजप आणि एनडीएला सातत्याने ‘सुपर परफॉर्म’ करावे लागेल. जोपर्यंत त्यांची कामगिरी खराब होत नाही, तोपर्यंत ते जिंकत राहतील आणि विरोधकांना पराभवाचा सामना करावा लागेल.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.