भाजपमध्ये काटाकाटीचा खेळ! सावे, कराड विरुद्ध केणेकर

संक्रांतीच्या अगोदरच भाजपमध्ये काटाकाटीचा खेळ रंगला आहे. मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांच्यापेक्षा मी कसा सरस आणि सक्षम आहे, हे दाखवण्यासाठी आमदार संजय केणेकर यांनी आपल्याच पक्षाचे कार्यालय वेठीस धरले. लाडक्या बहिणींनी मंगळवारी राडा केला, तेव्हा गायब असलेले केणेकर बुधवारी मात्र उगवले. एवढेच नाही तर त्यांनी राडा करणार्या कार्यकर्त्याला चक्क गाडीत बसवून पळवूनही नेले.
उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये असंतोष उफाळून आला आहे. नाराजांनी भाजप कार्यालयात ठाण मांडले असून नेत्यांना तिकिट नाकारण्याचा जाब विचारला आहे. मंगळवारी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालय डोक्यावर घेतले. मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड हे महिला कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी कार्यालयात आले. परंतु त्यांना या महिला कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले. आमदार संजय केणेकर हे काल कार्यालयाकडे फिरकलेही नाहीत.
आज सकाळीही सावे, कराड आले. नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला, काळे फासले, शिव्याशाप दिले. नाराजांचा उद्रेक पाहून सावे, कराड आल्यापावली निघून गेले. त्यानंतर आमदार संजय केणेकर आले. केणेकर आले आणि प्रशांत भदाणे पाटील या कार्यकर्त्याला घेऊन कक्षात गेले. त्यानंतर या कार्यकर्त्याला गाडीत बसवून ते निघून गेले. अवघ्या दोन मिनिटांत नाराजांचा कळप शांत झाला. सावे, कराड आल्यावरच कार्यकर्ते भडकले आणि केणेकर आल्यावर कसे शांत झाले, या उघड गुपिताची चर्चा सुरू झाली.
फडणवीसांच्या नजरेत येण्यासाठी
भाजप कार्यालयासमोर बुधवारी झालेला राडा हा भयंकर होता. अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड हे गाडीतून उतरले असते तर विपरीत घडण्याची शक्यता होती. परंतु हे दोघेही गाडीखाली न उतरल्याने अनर्थ टळला. आमदार संजय केणेकर यांची आमदारकी औटघटकेची आहे. पुढील संधी मिळवायची असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत भरण्यासाठी हा सगळा आटापिटा चालू असल्याचे भाजप कार्यकर्ते खुल्लम्खुल्ला बोलत आहेत. सावे, कराड हे पक्ष चालवू शकत नाहीत, मीच कसा सक्षम आहे हे दाखवण्याचा केणेकरांचा केविलवाणा प्रयत्न होता, असेही बोलले जात आहे.

Comments are closed.