सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण, भाजप अध्यक्ष अमित शहांसह इतर आरोपींच्या सुटकेला आव्हान

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने भाजप अध्यक्ष अमित शहांसह इतर आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या सुटकेला सोहराबुद्दीनच्या भावाने हायकोर्टात आव्हान दिले असून न्यायालयाने साक्षीदारांसह संबंधित खटल्याची सविस्तर माहिती पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले.

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी गुजरातमधील आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांच्यासह डी. जी. वंझारा, एम. एन. दिनेश आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते, मात्र यातील काही अधिकाऱ्यांची या खटल्यातून निर्दोष सुटका करण्यात आली. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने हायकोर्टात आव्हान दिले असून आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी घेण्यात आली. खटला सीबीआयविरुद्ध असतानाही महाराष्ट्रसह गुजरात व राजस्थान सरकारला याचिकेत प्रतिवादी का करण्यात आले, त्याबाबत खंडपीठाने याचिकाकर्त्यांना विचारणा केली.

निकालाला उशिरा आव्हान का दिले?

सत्र न्यायालयाच्या निकालाला उशिरा आव्हान देण्याचे कारण काय, असा सवालदेखील खंडपीठाने विचारला. या खटल्यात ज्या साक्षीदारांनी साक्ष नोंदवली त्याची सविस्तर माहिती पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेश देत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना यासाठी लागणारी कागदपत्रे सत्र न्यायालयाकडून मागवण्याची परवानगी दिली व सुनावणी दोन आठवड्याने ठेवली.

Comments are closed.