लोकसभा निवडणुकीत भाजपा १,49 4 crore कोटी रुपये खर्च करते
काँग्रेस 620 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर : ‘एडीआर’च्या अहवालातून माहिती उघड
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने सुमारे 1,494 कोटी रुपये खर्च केले असून हे प्रमाण एकूण निवडणूक खर्चाच्या 44.56 टक्के आहे. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 620 कोटी रुपये इतका खर्च केला. हे प्रमाण एकूण खर्चाच्या 18.5 टक्के आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात एकूण 32 राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या खर्चाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
16 मार्च ते 6 जून 2024 दरम्यान झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण 3,352.81 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यापैकी, केवळ राष्ट्रीय पक्षांचा खर्च 2,204 कोटी रुपये होता. हा खर्च एकूण खर्चाच्या 65.75 टक्के आहे. उर्वरित खर्च विविध राज्यांमधील प्रादेशिक पक्षांकडून केलेला दिसून येत आहे.
प्रचारावर 2 हजार कोटी रुपये खर्च
एडीआर अहवालानुसार, सर्वाधिक पैसे प्रचारावर खर्च झाले. सर्व पक्षांनी मिळून प्रचारावर 2,008 कोटी रुपये खर्च केले असून ते एकूण खर्चाच्या 53 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर प्रवास खर्च दुसऱ्या क्रमांकावर असून त्यावर 795 कोटी रुपये खर्च झाले. या रकमेपैकी 765 कोटी रुपये फक्त स्टार प्रचारकांच्या प्रवासावर खर्च झाले. तर उर्वरित 30 कोटी रुपये कार्यकर्ते आणि इतर प्रचारकांवर खर्च झाले.
निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय पक्षांनी 6,930.25 कोटी रुपये प्राप्त झाले होते. तर प्रादेशिक पक्षांना फक्त 515.32 कोटी रुपये मिळाले. म्हणजेच एकूण निधीपैकी 93.08 टक्के निधी राष्ट्रीय पक्षांना मिळाल्याचे एडीआर अहवालातून स्पष्ट झाले आहे. उमेदवारांना 402 कोटी रुपये रोख किंवा एकरकमी देण्यात आले. डिजिटल किंवा व्हर्च्युअल प्रचारावर 132 कोटी रुपये खर्च करण्यात आले. उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड प्रकाशित करण्यासाठी 28 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
अहवाल सादर करण्यास विलंब
प्रत्येक पक्षाला निवडणूक आयोगाला खर्चाचा तपशील 90 दिवसांच्या आत द्यावा लागतो, परंतु अनेक पक्षांना विलंब झाला. आम आदमी पक्षाने 168 दिवसांनी आपला अहवाल सादर केला. तर भाजपचा अहवाल 139 ते 154 दिवसांनी उशिरा आला. फक्त काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांची माहिती वेळेवर सादर केली होती. अजूनही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अनेक पक्षांचे अहवाल उपलब्ध नाहीत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, झामुमो, शिवसेना (यूबीटी) सारख्या पक्षांचा समावेश आहे. याशिवाय, पीडीपी आणि केरळ काँग्रेस (एम) सारख्या काही पक्षांनी निवडणूक लढवूनही शून्य खर्च दाखवला आहे. 690 अज्ञात पक्षांनी लोकसभा निवडणुकीत भाग घेतला होता, परंतु त्यांच्या खर्चाची माहिती अहवालात समाविष्ट नसल्याचे ‘एडीआर’ने स्पष्ट केले आहे.
दृष्टिक्षेप…
निवडणुकीतील एकूण खर्च : 3,352 कोटी रुपये
राष्ट्रीय पक्षांनी केलेला खर्च : 2,204 कोटी रुपये
सर्वपक्षीयांचा प्रचारावरील खर्च : 2,008 कोटी रुपये
Comments are closed.