दिल्लीत भाजप जिंकेल : मोदी

मोठ्या विजयासाठी कार्यकर्त्यांना दोन लक्ष्यं

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत भाजपचा विजय होणार असल्याचा दावा केला आहे. मेरा बूथ सबसे मजबूत कार्यक्रमाच्या अंतर्गत हजारो बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी मोठ्या विजयासाठी दोन लक्ष्यं दिली आहेत. आम आदीम पक्षाचा नारा ‘फिर आएंगे केजरीवाल’चा उल्लेख करत मोदींनी आप नेते फिर आएंगे म्हणत आहेत, परंतु जनता ते ‘फिर खाएंगे’ म्हणत असल्याचे उद्गार काढले आहेत.

दिल्लीत पक्षसंघटनेची शक्ती ही प्रत्येक बूथवर तीन ते चार पिढ्यांच्या कार्यकर्त्यांची आहे. ही शक्ती यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून देणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक बूथवर दोन लक्ष्यांसोबत काम केले जावे. मतदानाचे सर्व विक्रम मोडीत निघावेत आणि मागील  10 वर्षांमध्ये जितके मतदान झाले, त्याहून अधिक मतदान प्रत्येकाच्या बूथवर व्हावे. प्रत्येक बूथवर भाजपला 50 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळावीत म्हणून बूथच्या परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांची मने जिंकावीत अशी सूचना मोदींनी कार्यकर्त्यांना केली आहे.

भीतीपोटी दरदिनी नवी घोषणा

दिल्लीचे लोक आम आदमी पक्षाची आप-दा आणि त्यांचे असत्य तसेच फसवणुकीला वैतागून गेले आहेत. प्रथम काँग्रेस आणि मग आपने दिल्लीच्या लोकांचा मोठा विश्वासघात केला. हे आप-दा वाले आता दरदिनी नवी घोषणा करत आहेत. याचा अर्थ त्यांना दररोज पराजयाच्या नवनव्या बातम्या मिळत आहेत. आप नेते घाबरल्यानेच दररोज सकाळी एक नवी घोषणा करत आहेत. परंतु आता दिल्लीची जनता आम आदमी पक्षाची धूळफेक ओळखून असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

नाऱ्यावर उपरोधिक टीका

अरविंद केजरीवाल हे ‘फिर आएंगे’ म्हणत आहेत. तर दुसरीकडे लोक आप नेते फिर खाएंगे असे म्हणू लागले आहेत. आमच्या बूथ कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाचा भ्रष्टाचार लोकांसमोर आणावा. प्रत्येक घरात जात भाजप कोणती कामं करणार हे सांगावे. आम आदमी पक्षाने पक्कं घर मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यावर आम आदमी पक्षाने झोपडपट्टीवासीयांकडे नजरही फिरविली नाही. आता निवडणूक नजीक येताच पुन्हा घरं देऊ असे सांगत आहेत. आम आदमी पक्षाला 10 वर्षांमध्ये काम करण्यासाठी वेळ मिळाला नाही. तर दुसरीकडे केंद्र सरकारने गरीबांना पक्कं घर मिळवून दिल्याचा दावा मोदींनी केला आहे.

शीशमहाल मध्ये मजा

अरविंद केजरीवालांचे पूर्ण लक्ष शीशमहल निर्माण करण्यावर होते. शीशमहलमध्ये मौजमस्ती करण्यातच त्यांचा कार्यकाळ संपला. केजरीवालांचा शीशमहल पाहून प्रत्येक दिल्लीवासीयाच्या मनात संताप आहे. जनतेसोबत करण्यात आलेल्या विश्वासघातचा शीशमहल हा जिवंत पुरावा आहे. केजरीवालांनी स्वत:च्या महालाकरता पाण्यासारखा पैसा खर्च केला तर दुसरीकडे लोक स्वच्छ पाण्यासाठी भटकत राहिल्याची टीका मोदींनी केली.

Comments are closed.