पक्षाच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपची अग्रणी
केंद्रीय निवडणूक समिती लवकरच स्थापन होणार : शिवराज, खट्टर यांच्यासह काही नवीन नावेही चर्चेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टी लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव जाहीर करू शकते. भाजप नवीन अध्यक्षासाठी वेगवेगळ्या नावांवर विचार करत असून त्यात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. तसेच भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल आणि विनोद तावडे ही नावेही चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. वेगवेगळ्या राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होत असतानाच आता राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर असून ते मायदेशी परतल्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी भाजप संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक संतुलन, जातीय समीकरण या तीन मुख्य गोष्टी लक्षात घेत आहे. लवकरच राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी केंद्रीय निवडणूक समिती स्थापन केली जाऊ शकते. निवडणुकांची आवश्यकता भासल्यास ही समिती नामांकन, छाननी आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण करेल. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे. पी. न•ा यांचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या ते केंद्र सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे भाजप लवकरच नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी करत आहे. न•ा यांच्या जागी आता पक्षाचे नेतृत्त्व एखाद्या महिलेकडे सोपविले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
आतापर्यंत 37 पैकी 26 प्रदेशाध्यक्षांची निवड
पक्षाच्या घटनेनुसार निम्म्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होते. सध्या भाजपकडे 37 मान्यताप्राप्त राज्य युनिट आहेत. त्यापैकी 26 राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्षांची निवड झाली आहे. जुलैच्या सुरुवातीला भाजपने दोन दिवसांत 9 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली. पक्षाने 1-2 जुलै रोजी हिमाचल, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दमण दीव आणि लडाख आदी नऊ ठिकाणी प्रदेशाध्यक्षांची निवड केली. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता भाजप लवकरच आपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकतो.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून सर्वोच्च संघटनात्मक पदासाठी अनेक संभाव्य उमेदवारांबद्दल अंतर्गत चर्चा सुरू आहेत. सद्यस्थितीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहा नावे आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे नाव माध्यमांमध्ये चर्चेत आहे. त्यांची पक्षातील मजबूत पकड, जनसंघाशी संबंध आणि एकमत निर्माण करण्याची क्षमता भक्कम आहे. याशिवाय, राष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख दृढ असून संघटनेशी त्यांचा खोल संबंध आहे. याशिवाय, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, सुनील बन्सल, विनोद तावडे यांच्या नावेही चर्चेत असली तरी ऐनवेळी एखादी महिला किंवा नवा चेहराही पुढे आणला जाऊ शकतो.
Comments are closed.