भाजपचे राजेश तिरुअनंतपुरमचे महापौर आहेत.

चार दशकांनंतर संपुष्टात आले डाव्या पक्षांचे वर्चस्व

वृत्तसंस्था / थिरुवनंतरपुरम (केरळ)

केरळची राजधानी असणाऱ्या थिरुवनंतपुरममध्ये प्रथमच आपला नेता महापौरपदी निवडून आणून भारतीय जनता पक्षाने इतिहास घडविला आहे. केरळ राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने थिरुवनंतपुरमच्या महानगरपालिकेत 50 प्रभागांमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे महापौरपद याच पक्षाला मिळणार, हे निश्चित झाले होते. शुक्रवारी या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे नेते व्ही. व्ही. राजेश यांना 100 पैकी 51 मते मिळाली. त्यामुळे त्यांची विनासायास या महानगराच्या महापौरपदी निवड झाली. केरळच्या स्थानिक राजकारणात मोठे पद मिळविण्याची ही भारतीय जनता पक्षाची प्रथमच वेळ आहे.

व्ही. व्ही. राजेश हे या महानगरपालिकेच्या कोडुंगानूर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच ते भारतीय जनता पक्षाच्या केरळ शाखेचे सचिवही आहेत. गुरुवारी त्यांची या पदासाठी उमेदवार म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात डाव्या आघाडीने आर. पी. शिवाजी यांना, तर काँग्रेस आघाडीने के. एस. सबरीनाथन यांना उमेदवारी दिली होती. राजेश यांना दोन अपक्षांपैकी एकाने समर्थन दिले. त्यामुळे त्यांना 51 मते प्राप्त झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजी यांना 29 तर दुसरे प्रतिस्पर्धी सबरीनाथन यांना 17 मते मिळाली. थिरुवनंतपुरम महानगरपालिकेत 101 जागा असून सध्या 1 जागा रिक्त आहे. भारतीय जनता पक्षाने कारुमम प्रभागातून निवडून आलेले नगरसेवक जी. एस. आशा नाथ यांची निवड उपमहापौरपदाच्या उमेदवार म्हणून केली आहे.

इतके मोठे यश प्रथमच

केरळमध्ये भारतीय जनता पक्ष गेली सात दशके स्वत:चा प्रभाव निर्माण करण्यासाठी संघर्ष करीत आहे. तथापि, याचवेळी या पक्षाला प्रथमच इतके मोठे यश प्राप्त झाले आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राज्यात इतरत्र भारतीय जनता पक्षाची कामगिरी विशेष चमकदार झालेली नाही. तरीही या पक्षाने काही ग्रामपंचायती आणि दोन नगर पंचायतींमध्ये बहुमत मिळविले आहे. या पक्षाने थ्रिप्पुनीथुरा नगरपालिकेत बहुमत मिळविले असून तेथे नगराध्यक्ष पदासाठी पी. एल. बाबू यांची, तर नगरउपाध्यक्ष पदासाठी राधिका वर्मा यांची निवड केली आहे.

45 वर्षांच्या नंतर डाव्यांचा पराभव

केरळमध्ये सर्वसाधारणपणे दर पाच वर्षांनी राज्य सरकारमध्ये परिवर्तन होते. तथापि, थिरुवनंतपुरम महानगरपालिका 1980 पासून डाव्या आघाडीच्या ताब्यात आहे. या आघाडीचे वर्चस्व या महानगरातून संपुष्टात आणणे गेल्या साडेचार दशकांमध्ये काँग्रेसलाही जमलेले नाही. तथापि, यावेळी प्रथमच भारतीय जनता पक्षाने हे काम करुन दाखविल्यामुळे तो कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनला.

विधानसभा निवडणूक तोंडावर

पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू ही तीन राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशासह केरळमध्येही येत्या एप्रिल-मे मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आघाड्या आता त्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. थिरुवनंतपुरममध्ये मिळालेल्या विजयामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीही नव्या जोमाने या निवडणुकीसाठी सज्ज होत आहे.

Comments are closed.