मिल्किपूर पोटनिवडणुकीत भाजपाचा जोरदार विजय

चंद्रभानू पासवान 61 हजारांहून अधिक मतांनी विजयी

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या मिल्कीपूर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला. भाजप उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी ऐतिहासिक विजय नोंदवताना प्रतिस्पर्धी सपा उमेदवार अजित प्रसाद यांचा 61,710 मतांनी पराभव केला. चंद्रभानू पासवान यांना 1,46,397 तर सपाच्या अजित प्रसाद यांना 84,687 मते प्राप्त झाली.

मिल्कीपूर जागेवर भाजप आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष यांच्यात लढत होती. पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि बसपाने आपले उमेदवार उभे केले नाहीत. काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला होता. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपची आघाडी कायम राहिली. मिल्कीपूरची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. ही जागा जिंकून, भाजपचा प्रयत्न 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्या जिह्यातील फैजाबाद मतदारसंघातील पराभवाच्या जखमा भरून काढण्याचा होता. यामध्ये त्यांना यश मिळाले.

भाजपने चंद्रभानू पासवान यांना उमेदवारी दिली होती, तर समाजवादी पक्षाने फैजाबाद लोकसभा खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना उमेदवारी दिली होती. पोटनिवडणुकीत येथे 65.35 टक्के मतदान झाले. 2022 मध्ये सपाने मिल्कीपूर विधानसभा जागा जिंकली होती परंतु विद्यमान आमदार अवधेश प्रसाद फैजाबादमधून लोकसभेवर निवडून आल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

Comments are closed.