Black Coffee For Weight Loss: ब्लॅक कॉफी झटपट चरबी कमी करण्यास फायदेशीर

आपण रोज सकाळचा दिवस सुरुवात करताना चहा किंवा कॉफी घेतो. अनेकांच्या सवयीचा भाग असलेली कॉफी सध्या आरोग्यासाठी उपयोगी मानली जात आहे, विशेषतः वजन कमी करण्यासाठी आणि लिव्हर डिटॉक्ससाठी. पण ही कॉफी साधी नाही, तर “ब्लॅक कॉफी” असली पाहिजे. (black coffee weight loss fatty liver benefits)

‘ओन्ली मानिनी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी ब्लॅक कॉफीचे फायदे स्पष्टपणे मांडले. त्या म्हणाल्या, “ब्लॅक कॉफी लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करते, हे अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे. विशेषतः फॅटी लिव्हरच्या रुग्णांसाठी ती उपयुक्त ठरते. कॉफीमध्ये असे काही संयुगे असतात जी फॅट डिसॉल्व्ह करण्यास मदत करतात आणि लिव्हरवर येणारा ताण कमी करतात.”

पुढे त्या सांगतात, “ब्लॅक कॉफीमुळे फायब्रोसिस आणि सिरोसिससारख्या लिव्हरच्या गंभीर स्थितींमध्ये होणारी रासायनिक प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात थांबते किंवा मागे जाते. त्यामुळेच डॉक्टर फॅटी लिव्हर असलेल्या रुग्णांना योग्य प्रमाणात ब्लॅक कॉफी घेण्याचा सल्ला देतात.” मात्र चुकीचं पद्धतीने कॉफी घेणं घातक ठरू शकतं.

डॉ. प्रणिता पुढे स्पष्ट करतात की, “ब्लॅक कॉफी घेण्याचा सल्ला दिल्यावर अनेकांनी रोज चार-पाच कप कॉफी प्यायला सुरुवात केली. पण त्यात दूध, साखर आणि वेगवेगळे फ्लेवर्स मिसळून ती आरोग्यदायी राहात नाही. ही कॉफी वजन वाढवण्याचेच काम करते. म्हणूनच ‘कॉफी प्या’ याचा अर्थ ब्लॅक कॉफी प्या असा आहे म्हणजेच नुसती उकळलेली कॉफी पावडर आणि पाणी.”

ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीज फारच कमी असतात आणि ती मेटॅबोलिझम वाढवते. यामुळे शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया जलद होते आणि वजन कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. मात्र अतिरेक टाळावा. दिवसातून एकदा किंवा दोनदा, अन्नानंतर थोड्या वेळाने घेतलेली ब्लॅक कॉफी अधिक फायदेशीर ठरते.

वजन कमी करणं आणि लिव्हरचं आरोग्य राखणं यासाठी ब्लॅक कॉफी एक नैसर्गिक, साधा आणि स्वस्त उपाय ठरू शकतो. मात्र ही सवय योग्य पद्धतीने लावणं गरजेचं आहे. साखर-दूध घातलेली कॉफी आरोग्यास फायदेशीर नाही, हे लक्षात ठेवायला हवं. आहारातील चांगल्या सवयी आणि योग्य प्रमाण हेच दीर्घकालीन आरोग्य टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे.

Comments are closed.