BLOG : मध्यरात्री यशाची सोनेरी पहाट…


ब्लॉग: 2 नोव्हेंबरची मध्यरात्र..12 चा सुमार. नॅदिन डी क्लार्कने फटकवलेला चेंडू हरमनने हवेत सूर मारून झेलला आणि मध्यरात्रीच भारतीय महिला क्रिकेटची नवी पहाट झाली. यशाची सोनेरी किरणं मध्यरात्रीच डी. वाय. पाटील स्टेडियमच्या आकाशात पसरली. तब्बल 47 वर्षांची प्रतीक्षा संपली. महिला क्रिकेटच्या रित्या असलेल्या वर्ल्डकपच्या खजिन्यात एका ट्रॉफीने जागा पटकवली.

आतापर्यंत दोनदा फायनल गाठूनही भारतीय महिला टीमला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. या विश्वविजेतेपदासाठी झुलन, मितालीसह अनेकींनी गेल्या काही वर्षांत रक्ताचं पाणी केलंय. त्यांच्या घामाचे, फायनलमध्ये पराभूत झाल्यावर त्यांनी ढाळलेल्या अश्रूंचे आज मोती झाले.

झुलन, मितालीसह प्रमुख खेळाडू या विश्वविजेत्या रणरागिणींना कडकडून भेटत होत्या. भेटीमध्ये शब्दांची जागा आनंदाश्रूंनी घेतली होती. डबडबत्या डोळ्यांनी शाबासकी दिली जात होती. कडकडून मिठ्या मारल्या जात होत्या. हे चित्र भारतीय महिला संघासाठी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेतनंतर आलेलं. त्यातही या स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकल्यावर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तगड्या प्रतिस्पर्ध्यांकडून जिंकण्याच्या पोझिशनमधून आपल्याला पराभव पत्करावा लागलेला. त्या परिस्थितीतून भारतीय महिला टीमने जो फाईट बॅक केला, तो केवळ कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असाच होता.

सेमी फायलनमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचं 339 चं महाकाय आव्हान आणि फायनलमध्ये वुल्वार्टसारखी तगडी खेळाडू मैदानात असताना जिगरबाज खेळ करत आपल्या महिला टीमने नॉक आऊट मॅचेसमध्ये पकड निसटू दिली नाही.मला तुलना करायची नाहीये, पण सूर्यकुमारने मिलरचा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप फायनलमध्ये बाऊंड्रीला घेतलेला अफलातून कॅच आणि अंतिम लढतीत अमनजोतने वुल्वार्टचा लाँग ऑनला घेतलेला कॅच हा तितक्याच मोलाचा.

मोठ्या स्पर्धेत त्यातही विश्वचषकासारख्या महामंचावर बाजी मारणं हे महत्त्वाचं असतं. आपल्या वूमन ब्रिगेडने ते करून दाखवलंय. या टीमला कौतुकाची थाप देताना पडद्यामागील हीरो अर्थात टीमचा मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदारलाही सॅल्यूट करावा लागेल.

171 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 11 हजार 167 धावांचा रतीब ज्यात 30 शतकं, 60 अर्धशतकं… स्थानिक क्रिकेटमध्ये असा खणखणीत रेकॉर्ड असलेल्या अमोलने भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाच्या दारावर अनेकदा टकटक केली. पण, त्या इंडिया कॅपचा मुकूट काही त्याच्यावर डोक्यावर चढला नाही. ही जखम जशी त्याच्या मनात असेल तशीच ती त्याच्या चाहत्यांच्याही मनाला झालेली असणार. या विश्वविजेतेपदाने या जखमेवर काही प्रमाणात का होईना समाधानाची फुंकर नक्की घातली असेल. काटेरी वाटेवर चालणं, त्यातून पाय रक्तबंबाळ होऊनही नाउमेद न होता चालत राहणं, परफॉर्म करत राहणं यावर अमोलपेक्षा जास्त कोण बरं सांगू शकेल.

टीमची नौका हाती येताच हे फायटिंग स्पिरिट अमोलने टीममध्ये पेरलं, या स्पर्धेत आपण महत्त्वाचे तीन सामने गमावल्यावर ज्या पॉझिटिव्ह माईंडसेटने पुढचे सामने खेळलो, त्यातून याच बीजाची फळं मिळालेली दिसली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आपण गेल्या काही वर्षात राज्य करतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महिला क्रिकेटच्या नभांगणात यशाची नवी पहाट झालीय. आता या देदीप्यमान कामगिरीचा तेजसूर्य असाच तळपत राहो, हीच महिला टीमला शुभेच्छा देऊया.

Comments are closed.