BLOG : थँक यू कोच! थँक यू अमोल मुझुमदार


ब्लॉग: हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघानं अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली वन डे सामन्यांचा आयसीसी विश्वचषक जिंकल्यामुळं त्यांच्या संघर्षाला वयाच्या ५१व्या वर्षी न्याय मिळाला. वास्तविक सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्यासारख्या प्रतिभावान फलंदाजांच्या काळात मुझुमदारांचा उदय झाला होता. त्यांनी प्रथम दर्जाच्या १७१ सामन्यांमध्ये अकरा हजार १६७ धावांचा रतीब घातला. पण एवढ्या धावांचा डोंगर रचूनही अमोल मुझुमदारांना भारतीय संघात खेळण्याची कधीही संधी मिळाली नाही.

भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून 2023 साली मिळालेल्या नव्या जबाबदारीनं अमोल मुझुमदार यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. मुझुमदारांनी अतिशय समर्पित वृत्तीनं ती जबाबदारी सांभाळली आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

रमाकांत आचरेकर सर आज हयात असते, तर भारतीय महिलांच्या विश्वचषक विजयाचा सर्वाधिक आनंद त्यांना झाला असता… हरमनप्रीत कौर आणि तिच्या विमेन ब्रिगेडच्या या यशाला खऱ्या अर्थानं परिस स्पर्श होता तो आचरेकर सरांचा पट्टशिष्य आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा. त्यामुळंच कर्णधार हरमनप्रीत कौरनं अमोल मुझुमदारना वाकून नमस्कारही केला.

वास्तविक बलविंदरसिंग संधू आणि सचिन तेंडुलकरसारख्या आचरेकर सरांच्या पट्टशिष्यांनी भारताला पुरुषांचा वन डे विश्वचषक नक्कीच जिंकून दिलाय. पण तो एक खेळाडू या नात्यानं. पण आचरेकर सरांचा पट्टशिष्य असलेल्या लालचंद राजपूत यांच्यानंतर भारताला प्रशिक्षक म्हणून विश्वचचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली ती अमोल मुझुमदार यांनी.

धोनीच्या टीम इंडियानं 2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक जिंकला, त्यावेळी लालचंद राजपूत भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाचे प्रशिक्षक होते. त्यानंतर अठरा वर्षांनी भारताच्या महिला संघानं पहिल्यांदाच वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय.

हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाच्या या पराक्रमाला उर्जा ती प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांची. चक दे इंडिया चित्रपटाच्या पडद्यावर शाहरुख खाननं कबीर खानची. म्हणजे वास्तवातली मीररंजन नेगींची भूमिका साकारली होती. भारतीय महिला संघाच्या ताज्या यशोकहाणीत अमोल मुझुमदार हा जणू चक दे इंडियाच्या कबीर खान ठरलाय.

भारताच्या महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रं अमोल मुझुमदार यांच्या हाती आली त्यावेळी मिताली राज आणि झुलन गोस्वामीसारख्या अनुभवी शिलेदार निवृत्त झाल्या होत्या. त्यामुळं भारतीय महिलांची नव्यानं संघबांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. अमोल मुझुमदार यांनी राष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबई आणि आयपीएलमधल्या राजस्थान रॉयल्ससारखी नवी जबाबदारीही समर्थपणे पेलली.

गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय महिला संघाची कामगिरी ढासळली. अमोल मुझुमदारांनी नाउमेद न होता… खेळाडूंची वैयक्तिक शिस्त, त्यांचा आत्मविश्वास आणि सांघिक जबाबदारीसारख्या बाबींवर मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीला 2025 साली यश मिळू लागलं. भारतानं इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवलं. मग मायदेशातल्या मालिकेत ऑस्ट्रेलियावरही विजय साजरा केला.

पण मायदेशातल्या वन डे विश्वचषकात भारतीय महिलांना पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. इथंच अमोल मुझुमदारांचा अनुभव कामी आला. त्यांनी हरमनप्रीत आणि तिच्या सहकाऱ्यांना काहीसं फटकारलं, काहीसं सांभाळूनही घेतलं, पण त्यांच्यातली जिद्द पुन्हा जागवण्याचं मुख्य काम त्यांच्या शब्दांनी केलं. हरमनप्रीत कौरनं टेलिव्हिजनवरच्या गप्पांमध्ये मुझुमदारांच्या त्या व्याख्यानाचं सात्विक संताप आणि सच्चे बोल असं पॉझिटिव्ह वर्णन केलं.

अमोल मुझुमदारांच्या सात्विक संतापातून आलेल्या सच्च्या बोलांनी खरोखरच जादू केली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून झालेल्या लागोपाठ तीन पराभवांनी खचून न जाता हरमनप्रीत कौर आणि तिच्या रणरागिणी नेटानं पुन्हा उभ्या राहिल्या… आणि मग त्याच मुलींनी वन डे विश्वचषकाच्या मैदानात नवा इतिहास घडवला.

Comments are closed.