द.आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आयपीएलला धक्का, राष्ट्रीय कर्तव्यासाठी प्ले ऑफआधीच मायदेशी परतणार

देशात सीमेवर सुरू असलेल्या युद्धसदृश स्थितीमुळे बीसीसीआयने देशहितासाठी आयपीएलला एका आठवडय़ाचा ब्रेक दिला तेव्हाच ऑस्ट्रेलियन आणि दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचे पुन्हा आयपीएल खेळणे अवघड असल्याचे अंदाज दै. ‘सामना’ने वर्तवले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे. आठ दिवसांच्या ब्रेकमुळे आयपीएलचे वेळापत्रक लांबल्याने प्ले ऑफ सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मायदेशी परतावे लागणार असल्याचे वृत्त धडकल्याने आयपीएल संघांच्या पोटात गोळा आला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपली आयपीएल गुंडाळून राष्ट्रीय कर्तव्यासाठी लंडन गाठावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येत्या 11 ते 15 जूनदरम्यान लॉर्ड्सवर डब्ल्यूटीसाचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार आयपीएलचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळविला जाणार होता, मात्र एका आठवडय़ाच्या ब्रेकमुळे आयपीएलचे वेळापत्रक लांबले. दक्षिण आफ्रिकेच्या 8 खेळाडूंना 26 मे पर्यंत मायदेशी परतण्याच्या साना त्यांच्या बोर्डाने दिल्या आहेत. यात गुजरात टायटन्सचा पॅगिसो रबाडा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लुंगी एनगिडी, पंजाब किंग्सचा माकाx यानसन, मुंबई इंडियन्सचे कॉर्बिन बॉश व रायन रिकल्टन, लखनौ सुपर जायंट्सचा एडन मार्करम, दिल्ली कॅपिटल्समधील ट्रिस्टन स्टब्ज व सनरायझर्स हैदराबादचा वॅन मुल्डर यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचे हे आठही खेळाडू 30 मे रोजी डब्ल्यूटीसी फायनलसाठी इंग्लंडला रवाना होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचे आठ खेळाडू 26 मे रोजी मायदेशी परतल्यास आयपीएलमधील त्यांच्या संघांची घडी विस्कटणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 20 दक्षिण आफ्रिकन खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे येता शनिवार, 17 मेपासून उर्वरित आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
स्टार्क, हेझलवूड, इंगलिस यांनाही परतावे लागणार
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील मिचेल स्टार्क (दिल्ली), जॉश हेझलवूड (बंगळुरू), जॉश इंगलिस (पंजाब) या खेळाडूंसाठी आपला राष्ट्रीय संघ महत्त्वाचा आहे आणि त्यांना आगामी डब्ल्यूटीसीच्या फायनलच्या सरावासाठी लंडन गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकही ऑस्ट्रेलियन आयपीएलसाठी राष्ट्रीय संघाच्या कार्यक्रमांना टाळणार नाही. त्यामुळे या तीनही खेळाडूंना आयपीएल सोडून मायदेशी परतावे लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख फलंदाज जॅक फ्रेझर मॅकगर्कने ऐन प्ले ऑफच्या टप्प्यावर वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागेवर बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिझुर रहमान याला संघात घेण्यात आले आहे. हैदराबादचा संघ साखळीतच गारद झाल्यामुळे कर्णधार पॅट कमिन्स आणि घणाघाती फलंदाज ट्रव्हिस हेड हे आयपीएलमध्ये खेळले नाहीत तरी या संघाला फारसा फरक पडणार नाहीय.
Comments are closed.