बिगुल वाजले… प्रभागरचना जाहीर बिगुल वाजले… प्रभागरचना जाहीर; मुंबई महापालिकेचे 227 वॉर्ड जैसे थे!

तब्बल तीन वर्षे निवडून आलेल्या नगरसेवकांशिवाय कारभार चाललेल्या आशिया खंडातील सर्वात मोठय़ा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून प्रभागरचना पालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. याआधीच्या 227 प्रभागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यावर उद्यापासून 4 सप्टेंबरपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर पालिकेचा कारभार राज्य सरकारने नेमलेल्या प्रशासकाकडून सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या विकास आणि नागरी प्रश्नांसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आयुक्त तथा प्रशासकाकडेच आहेत. आता मात्र पालिका निवडणुकीच्या वाटेतील सर्व अडसर दूर झाले आहेत.

मतदानाचा प्रभागही तोच राहणार

मुंबई पालिकेच्या 2017 निवडणुकीप्रमाणेच सीमांकन राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच बहुतांशी प्रभागांच्या क्रमांक आणि सीमा पहिल्याप्रमाणेच कायम असल्याचे प्रारूप आराखडय़ात दिसत आहे. त्यामुळे सूचना-हरकती जास्त येणार नसल्याचा अंदाज पालिका प्रशासनाचा आहे. त्यामुळे मतदारांचा प्रभाग कायम राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

अशी होणार कार्यवाही

प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखडय़ावर आलेल्या हरकती-सूचनांवर आठवडाभरात पालिकेने दिलेल्या ठिकाणी जनसुनावणी होईल. हे आक्षेप निश्चित करून संबंधित प्राधिपृत अधिकारी राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेस सादर करेल. त्यानंतर निवडणूक आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील. त्यांच्या मान्यतेनंतर पालिका आयुक्त अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करतील. मतदार यादी प्रक्रिया आणि आरक्षण लॉटरीसाठी प्रत्येकी किमान एका महिन्याचा कालावधी लागेल.

कल्याण-डोंबिवलीत 122 जागांसाठी 31 प्रभाग

प्रभाग रचनेनुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेत एपूण 122 जागा असणार आहेत. यासाठी शहराची विभागणी 31 प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. या प्रभागांपैकी 2 प्रभाग हे 3 सदस्यीय असतील तर उर्वरित 29 प्रभाग 4 सदस्यीय असतील. यावर नागरिकांना उद्या शनिवारपासून हरकती नोंदवता येणार आहेत. सन 2025 मधील कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचना या स्वरूपात पार पडणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्राची एपूण लोकसंख्या 15,18,762 इतकी नोंदवली गेली आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,50,171 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,584 इतकी असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबईत 111 नगरसेवक

नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेनुसार शहरात एपूण 111 जागा आहेत. चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे.

ेपठाणे महापालिकेची प्रभाग रचना पालिकेच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

आता उत्सुकता आरक्षणाची

प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर मतदार यादीदेखील प्रसिद्ध करून हरकती-सूचना मागवल्या जातील. सुनावणीनंतर त्या अंतिम केल्या जातील. यानंतर आरक्षण जाहीर करून हरकती-सूचना मागवून सुनावणी घेण्यात येईल. यानंतरच आरक्षण लॉटरी काढण्यात येईल. इथून प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात होईल.

पुण्यात 41 प्रभाग, 165 नगरसेवक

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची प्रारुप रचना शुक्रवारी जाहीर झाली. 41 प्रभागातून 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत. 40 प्रभाग हे 4 सदस्यीय असून, प्रभाग क्रमांक 38 (आंबेगाव-कात्रज) हा 5 सदस्यीय संख्येचा असणार आहे. लोकसंख्येनुसार हा प्रभाग सर्वांत मोठा असेल.

पिंपरी-चिंचवडमध्ये 32 वॉर्ड

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2017 प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. सन 2011च्या 17 लाख 27 हजार 692 लोकसंख्येप्रमाणेच प्रभाग रचना तयार केली आहे. तळवडे-चिखली भागातून प्रभाग रचना सुरू करून सांगवी-दापोडी अशा उतरत्या क्रमाने पूर्ण केली. त्यानुसार 32 प्रभाग असून 128 नगरसेवक असणार आहेत.

Comments are closed.