बोनस नसल्याने ‘आशा’ सेविकांची दिवाळी काळी! सिटू संलग्न आशा युनियनचा आंदोलनाचा इशारा
मुंबई महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना 33 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला असला तरी ‘आशा’सेविकांना मात्र बोनस जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ‘आशा’ सेविकांची दिवाळी ‘काळी’ होणार आहे. त्यामुळे ‘सिटू’ संलग्न ‘आशा’ युनियनने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आशा सेविका महानगरपालिकेच्या वतीने घरोघर आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतात. कोरोनासारख्या साथीत जीव धोक्यात घालून त्यांनी अहोरात्र काम केले, परंतु त्यांच्या या कष्टाचा परतावा त्यांना कधीच मिळाला नाही. आशा आणि सीएचव्ही यांचे काम एकसमान आहे. सीएचव्हींना 16,000 रुपये बोनस जाहीर झाला आहे. परंतु दिवाळीसारख्या सणाच्या वेळीदेखील आशा सेविकांचा विचार न करणे ही बाब अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण असून निषेधार्ह आहे. पालिकेच्या अंतर्गत तळागाळात आरोग्य सेवेचे काम करणाऱ्या एनएचएम व पालिका ‘आशां’ना दिवाळी बोनस मिळावा यासाठी गेली अनेक वर्षे मागणी केली जात आहे.
पाच हजार रुपये बोनस द्या – महापौर
मुंबई महापालिका क्षेत्रात कार्यरत आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात येणार आहे. यासंदर्भात महापौर रितू तावडे यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लेखी निर्देश दिले आहेत. आशा स्वयंसेविकांचे सानुग्रह अनुदान तत्काळ मंजूर करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
Comments are closed.