रस्त्यांच्या काँक्रिटीकरणानंतर खोदकामाला परवानगी नाही, पालिका आयुक्तांचे अभियंत्यांना स्पष्ट निर्देश
मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. याबाबत विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांना अवगत करण्यात आले आहे. एकदा काँक्रिटीकरणाची कामे झाली की, कोणत्याही संस्थेला खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अभियंत्यांना दिले आहेत.
मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण 324 किलोमीटर (698 रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात 377 किलोमीटर (1420 रस्ते) असे एकूण मिळून 701 किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. टप्पा-1 मधील 75 टक्के कामे आणि टप्पा-2 मधील 50 टक्के कामे 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच 31 मेपर्यंत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने पूर्ण करा, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका अभियंत्यांना दिले आहेत.
महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त उल्हास महाले, प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्यासह रस्ते व वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कामाचे वेळापत्रक तयार करा !
दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील काँक्रिटीकरण कामांचे वेळापत्रक तयार करावे. त्याचा योग्य पाठपुरावा करावा. रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. जो रस्ता अपूर्णावस्थेत आहे तो रस्ता प्राधान्याने पूर्ण करावा. अपूर्णावस्थेतील रस्ते पूर्ण करूनच नवीन काम हाती घ्यावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केल्या.
Comments are closed.