वडिलांच्या निवासस्थानामुळे मुलीचे निवृत्तीवेतन रखडवले, पालिकेचा अजब कारभार

वडिलांनी घेतलेल्या सेवा निवासस्थानामुळे त्यांच्या विवाहित मुलीचे निवृत्तीवेतन रखडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालिकेच्या या अजब कारभारामुळे आश्चर्य व्यक्त होत असून आपल्याला न्याय मिळावा यासाठी सदर महिलेला दोन वर्षांपासून पालिका कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.
पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागात उपप्रमुख अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या शलाका मुकणे या गतवर्षी 31 मे 2023 रोजी निवृत्त झाल्या. निवृत्तीवेतन दाव्याची पूर्तता करण्यासाठी त्यांना मालमत्ता विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक होते, मात्र देवनार म्युनिसिपल कॉलनीत त्यांचे वडील प्रताप साटम यांच्या नावे सेवा निवासस्थान असून ते रिक्त न केल्याचे कारण देत शलाका मुकणे यांचे निवृत्तीवेतन पालिकेने रोखले आहे.
माझ्या वडिलांना 1969 साली देवनार म्युनिसिपल कॉलनी येथे सेवा निवासस्थान देण्यात आले होते. 1986 साली त्यांचे निधन झाले आणि 1987 साली लग्न होऊन मी शंकरा कॉलनी, गोवंडी येथे राहण्यास गेले. वडिलांच्या या सेवा निवासस्थानाशी माझा काही संबंध नसतानाही पालिकेने गेल्या दोन वर्षांपासून माझे निवृत्तीवेतन रखडवले आहे, असा आरोप शलाका मुकणे यांनी केला आहे. दरम्यान या संदर्भात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
… मीठ आम्हाला वेगळे आहे?
देवनार म्युनिसिपल कॉलनी येथे 450 हून अधिक सेवा निवासस्थाने असून ही सोसायटी सात ते आठ वर्षांपूर्वी रजिस्टर झाली आहे. अनेकांचे वारस पालिकेत नोकरीस असून 375 वारसांना त्यांच्या निवृत्तीनंतरची थकबाकी पालिकेने दिली आहे. सोसायटीचे फेडरेशनन 2017 साली आमच्या विरोधातील केस हरले आहेत, असे पालिकेचे म्हणणे आहे. मग 2019-20 साली 375 वारसांना कशाच्या आधारावर रखडलेली देणी दिली? सेवा निवासस्थान कोणीच रिक्त केले नाही, मग आमच्या 28 जणांबाबतच वेगळा न्याय का, असा सवाल मुकणे यांनी उपस्थित केला आहे.
Comments are closed.