BMC Election 2026 – पती वॉर्ड क्र. 158 मध्ये तर पत्नी वॉर्ड क्र. 159 मध्ये, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (15 जानेवारी) सकाळपासून मतदान सुरू आहे. नागरिकही उत्साहाने मतदान केंद्रावर जाऊन आपले मत नोंदवत आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरत आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे अंधेरी साकीनाका येथील घटनेतून दिसून येत आहे. साकीनाका येथील एका जोडप्याचे नाव वेगवेगळ्या वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहे. अशा अनेक घटना समोर येत आहेत.

अंधेरीच्या साकीनाका परिसरात मोहिली पाईप लाईन आशिर्वाद धाम सोसायटीतील रहिवासी अश्विनी नामदेव मुंडये आणि प्रशांत नामदेव मुंडये यांना निवडणूक आयोगाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे मनस्ताप सहन करावा लागला. प्रशांत मुंडये यांचे नाव वॉर्ड क्र. 158 मध्ये तर त्यांच्या पत्नीचे नाव वॉर्ड क्र. 159 मध्ये टाकण्यात आले आहे.

दरम्यान, एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या वॉर्डमध्ये टाकल्याच्या घटना समोर येत आहेत. याशिवाय मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आल्याने मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी या केंद्रावरून त्या केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत.

Comments are closed.