प्रदूषणकारी बांधकामे रोखणार, हवेच्या गुणवत्तेवर बारीक लक्ष… प्रत्येक वॉर्डात भरारी पथक

मुंबईत थंडीसोबत हवाप्रदूषणामध्येही वाढ होण्यास सुरुवात झाल्याने पालिकेने प्रदूषणकारी प्रकल्पांना हवाप्रदूषण टाळण्यासाठी 28 प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. हे नियम मोडणारी बांधकामे, प्रकल्पांची कामे बंद करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे. यामध्ये बांधकामाच्या ठिकाणचा वायू गुणवत्ता निर्देशांक 200 पेक्षा अधिक असल्यास काम बंद करण्यात येईल. यावर नजर ठेवण्यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये भरारी पथकांची नेमणूकही करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.
मुंबईत सध्या विविध प्रकारची सहा हजारांवर बांधकामे सुरू आहेत. या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणाहून बाहेर येणारी धूळ वाढलेल्या प्रदूषणासाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालिकेने नियमावली जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या नियमांमध्ये सर्वाधिक निर्देश बांधकाम प्रकल्पांना देण्यात आले आहेत. यानुसार आता वॉर्ड स्तरावर कारवाई करण्यात येणार असून तपासणी, स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम प्रकल्प सील करण्याची कारवाई करण्यात येईल. विविध उपाययोजना राबवूनदेखील वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स -एक्यूआय) सातत्याने 200 पेक्षा अधिक राहिल्यास त्या
परिसरातील उद्योग आणि बांधकामे ‘ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन
प्लॅन-4’ (ग्रॅप-4) अंतर्गत बंद करण्यात येतील, असेही अश्विनी जोशी यांनी सांगितले आहे. याच्या अंमलबजावणीसाठी पालिकेचे सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अशा होताहेत उपाययोजना
हवाप्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्वच्छ इंधनावर बेकरी चालवणे, इलेक्ट्रिक शवदाहिनी, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक पर्यावरणस्नेही बनविण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर, बांधकामाच्या राडारोडय़ावर शास्त्राsक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टिंग मशीनच्या सहाय्याने रस्त्यांवर पाणी फवारणी उपाययोजना पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नियमावली पालिकेच्या https://www.mcgm.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Comments are closed.