वायू प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ‘मेट्रो’ला पालिकेची ‘कारणे दाखवा’ नोटीस, उपाययोजना न केल्यास ‘काम बंद’ कारवाईचा इशारा

वायू प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने जाहीर केलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करून वायूप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱया ‘मेट्रो’च्या जे. कुमार पंत्राटदाराला पालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. गुंदवली-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो 7-अ मार्गिकेच्या कामात वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालिकेने ही कारवाई केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही केली नाही तर काम बंदची कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेने मेट्रोला दिला आहे.
मुंबईमध्ये हवा प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने 31 प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. मुंबईतली सर्व बांधकामे, रस्ते कंत्राटदार आणि इतर कामांच्या ठिकाणी याबाबत उपाययोजना करणे बंधनकारक आहे. मात्र मेट्रो पंत्राटदार जे. कुमार कंपनीकडून वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. दहिसर-गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेचा विस्तार म्हणून मेट्रो 7-अ चे 3.4 किमी काम सुरू आहे. यापैकी 0.94 किमी उन्नत तर 2.503 किमी भुयारी मार्गिका आहे. दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीत कंत्राटदार कंपनीकडून प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक 28पैकी अनेक मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले.
…म्हणूनच केली कारवाई!
पालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार धूळ नियंत्रणाची उपाययोजना अपुरी, पाडकामातून तयार होणारा कचरा उघडा ठेवणे, वाहन स्वच्छतेची अपूर्ण नोंद यांसारख्या अनियमितता आढळल्या आहेत.
एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम बसवण्याकडे दुर्लक्ष
9 जानेवारी 2025 रोजी उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व बांधकाम प्रकल्पांना सेन्सर-आधारित एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम बंधनकारक केली आहे. त्यानुसार पीएम 2.5 आणि पीएम 10 प्रदूषकांचा रिअल-टाईम डेटा एलईडीवर सार्वजनिकरित्या दाखवणे आवश्यक आहे. मात्र एमएमआरडीएच्या या प्रकल्पस्थळी अशी कोणतीही प्रणाली बसवलेली नसल्याचे पालिकेच्या पथकाने नोंदवले.

Comments are closed.