महापालिकेला जाग आली, प्रदूषणकारी 53 बांधकामांवर बंदी
मुंबईत वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱया 53 बांधकामांचे काम पालिकेने बंद केले आहे. बांधकामांनी एअर क्वालिटी इंडेक्स दर्शवणारे सेन्सॉर बसवावेत आणि पालिकेने जाहीर केलेली इतर 27 प्रकारचे नियम पाळावेत, अन्यथा पालिका सक्त कारवाई करेल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. धुरकट वातावरण आणि हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रचंड प्रदूषण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये स्वच्छ इंधनावर बेकरी तसेच स्मशानभूमी कार्यान्वित करणे, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक पर्यावरणस्नेही बनविण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर, बांधकामाच्या राडारोडय़ावर शास्त्राsक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टिंग मशीनच्या सहाय्याने रस्त्यांवर पाणी फवारणी यासह विविध उपाययोजनांचा समावेश आहे. यामध्ये पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अविनाश काटे यांच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
अशी झाली कारवाई
प्रदूषण नियंत्रणाचे नियम मोडणाऱयांवर कारवाई करण्यात येत असून 26 नोव्हेंबरपर्यंत एकूण 53 बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘जी दक्षिण’ विभागातील सिद्धार्थ नगर परिसरातील 17, ‘ई’ विभागातील माझगाव परिसरातील 5, ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पश्चिम) परिसरातील 31 बांधकामांचा समावेश आहे.
अशी आहे नियमावली
वायुप्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने 5 ऑक्टोबर 2024 रोजी 28 प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पत्र्यांचे पुंपण उभारणे, हिरव्या कपडय़ाचे आच्छादन करणे, पाणी फवारणी करणे, राडारोडय़ाची शास्त्राsक्तरीत्या साठवण व ने-आण करणे, बांधकामाच्या ठिकाणी वायुप्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवणे, धूरशोषक यंत्र बसवणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
झाडाझडतीसाठी 95 भरारी पथके
वायुप्रदूषण नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होत आहे का, हे पाहण्यासाठी 24 वॉर्डमध्ये पालिकेच्या माध्यमातून 95 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके सरप्राइज व्हिजिट करणार असून प्रदूषण नियंत्रण नियमावली पालन केली जात नसल्याचे समोर आल्यास कठार कारवाई केली जाणार आहे.
प्रदूषणाला सरकारच जबाबदार
मुंबईत भाजप सरकारसाठी बिल्डर आणि कंत्राटदार महत्त्वाचे आहेत. बांधकाम आणि पाडकाम अशा विकासाच्या नावाखाली शेकडो मोठय़ा झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला सरकारच जबाबदार आहे, असा हल्ला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नियम शिथिल करण्याची तयारी सरकारने सुरू केली असून ते ‘विकास’ म्हणजेच बिल्डरांसाठी खुले करण्याचा डाव आहे. हा निर्णय मुंबईच्या पर्यावरणासाठी धोकादायक ठरेल, असेही ते म्हणाले आहेत.
Comments are closed.