गोराईतील कोळीवाडे नव्या मजबूत पुलाने जोडणार! पालिकेकडून लवकरच पुनर्बांधणी

गोराई परिसरातील लोअर कोळीवाडा आणि अप्पर कोळीवाडा या दोन भागांना जोडणारा पूल जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणच्या पुलाचे पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. 100 मीटरचा हा पूल बांधण्यासाठी केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून कोस्टल रेग्युलेशन झोन अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, हा पूल पाडल्यास अप्पर आणि लोअर कोळीवाड्यांचा संपर्क तुटणार आहे. त्यामुळे रहिवाशांना 700 मीटरचा वळसा घ्यावा लागेल. त्यामुळे रहिवाशांसाठी सोयीच्या पर्यायी मार्गाची मागणी केली आहे.

पालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या तपासणीत हा पूल धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. हा पूल सीआरझेडच्या बफर झोनमध्ये येत असल्याने नव्या, तांत्रिकदृष्ट्या मजबूत पुलाची आवश्यकता असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सुमारे चार कोटी रुपयांच्या खर्चाने हा नवीन पूल उभारण्यात येणार असून त्यामध्ये रेलिंग, फूटपाथ आणि लाइट पोल्स यांसारख्या सुविधा असतील. हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव विकास आराखडा 2034 मध्ये आधीच समाविष्ट करण्यात आला आहे.

पालिका म्हणते…

नव्या पुलामुळे दीर्घकाळ टिकणारी सुविधा उपलब्ध होईल. मात्र नागरिकांचा प्रश्न आहे की भरतीच्या काळात वाहतुकीसाठी कोणती सुरक्षित पर्यायी सोय केली जाणार आहे? सध्या बीच रोड पाण्याखाली जातो आणि दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. मात्र पालिकेने याबाबत माहिती दिलेली नाही, असे रहिवासी सांगतात.

‘आधी चर्चा, मगच काम सुरू करा’

स्थानिक मच्छीमार आणि रहिवासी यांनी पालिकेकडे मागणी केली आहे की, पूल पाडण्यापूर्वी नागरिकांशी चर्चा करून व्यवहार्य पर्यायी मार्ग ठरवावा. अन्यथा, आपत्कालीन परिस्थितीत अ‍ॅम्ब्युलन्स वा अग्निशमन दलाच्या गाड्यांना प्रवेश मिळणेही कठीण होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Comments are closed.