एल्फिन्स्टन पुलाचा वारसा जपणार, पुलासाठी वापरलेल्या बेसाल्ट दगडांचा वापर करून बनवणार छोटी प्रतिकृती

मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू असताना, तब्बल 113 वर्षे पुलाची कमान मजबुतीने धरणारे बेसॉल्ट दगड आता नव्या उपयोगात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या दगडांचे संकलन करून शहरातील एखाद्या मोकळ्या जागेत पुलाची छोटी प्रतिकृती उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या वारसा विभागाकडून जतन केलेले दगड स्वच्छ करून, क्रमांक लावून, त्यांना नवी झळाली दिली जाणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केले जात आहे. या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल बांधला जाईल आणि तो शिवडी- वरळी कनेक्टरशी जोडला जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प महत्त्वाचा पायाभूत विकास उपक्रम म्हणून पाहिला जात आहे.

130 मीटर लांबीचा एल्फिन्सन्ट पूल 20व्या शतकात दगडी बांधकामाच्या शैलीत उभारला होता. तेव्हा सिमेंटचा वापर होत नसल्याने एकमेकात घट्ट बसणारे बेसॉल्ट दगड वापरले जात. पुलाच्या तळाशी असलेल्या दोन कमानी पादचारी मार्गासाठी तयार केलेल्या होत्या. प्रत्येक कमानीत 37 अशा मिळून 74 दगड वापरले गेले होते.

वारसा विभागाचे अभियंता संजय आधाव यांनी सांगितले की, प्रत्येक दगड सुमारे एक टन वजनाचा आहे. हे दगड हाताने काढून ट्रकमधून टेक्सटाईल मिल्स कंपाऊंड येथे हलवले जात आहेत. सर्व दगड जमा झाल्यावर त्यांना पॉलिश करून त्याचा छोटेखानी पूल बनवला जाईल. बागांमधील छोट्या आर्च ब्रिजप्रमाणे हे मॉडेल पाण्याच्या तळ्यावर उभारले जाईल. तसेच पुलाच्या वारशाबद्दल माहिती देणारा फलकही बसवला जाणार आहे.

हे दगड न घेतल्यास ते ठेकेदारांकडून मोडून टाकले गेले असते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पूर्वी रे रोड पुलाचे दगड वापरून ऑगस्ट क्रांती मैदानात प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. कार्नॅक पुलावरील बेसॉल्ट पट्ट्या जतन करून नव्या पुलावर बसवण्यात आल्या आहेत.

संरक्षण वास्तुशास्त्र तज्ज्ञ किर्तीदा यांनी सांगितले की, एल्फिन्स्टन पुलातील दगड हेच दगड मुंबईतील अफगाण चर्च आणि इतर इमारतींसाठी वापरले गेले होते. मालाड, कुर्ला परिसरात पूर्वी बेसॉल्ट दगडांच्या खाणी असल्याने याच दगडांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला.

1913 मध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या या पुलाचे नाव मुंबईचे गव्हर्नर जॉन एल्फिन्स्टन यांच्या नावावरून पडल्याचे मानले जाते. हा पूल ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेने (GIPR) बांधला. त्यावेळी परळ परिसरातील वस्त्रोद्योग आणि कामगार वसाहतींना जोडण्यासाठी हा पूल उभारण्याची गरज भासली होती.

पुलाचे बांधकाम 1905 मध्ये सुरू झाले आणि ते कंत्राटदार बोरमंजी रुस्तमजी यांनी स्कॉटिश कंपनी P & W Maclellan Ltd. यांच्या सोबत पूर्ण केले. पुलावरील लोखंडी पट्टीवर “Parel Bridge GIPR 1913” अशी नोंद आढळते. मात्र नोंदींमध्ये पुलाची नावे वेगवेगळी असल्यामुळे अधिकृत नावाबाबत संभ्रम असल्याचे तज्ज्ञ भरत गोठोस्कर यांनी सांगितले. MMRDA पुलाचे पाडकाम आणि नव्या उड्डाणपुलाचे बांधकाम करत असताना, पालिकेने या ऐतिहासिक दगडांचे जतन करून मुंबईच्या वारशातील हा महत्त्वाचा भाग पुढील पिढ्यांसाठी जपण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments are closed.