सलमान, सैफ, रोहित अन् आता टायगर… कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; AICWA चे गृहमंत्र्यांना पत्र, चित्रपटसृष्टी मुंबईबाहेर नेण्याचा इशारा
मुंबईतील वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आणि बॉलिवूड कलाकारांवर सातत्याने होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे चित्रपटसृष्टीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. नुकताच अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहू येथे गोळीबार झाल्याची घटना घडली. यानंतर ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ आक्रमक झाली आहे. एआयसीडब्ल्यूएने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, कलाकार आणि कामगारांना तातडीने कडेकोट सुरक्षा पुरवण्यात यावी, अन्यथा बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईतून इतरत्र हलवण्याचा इशारा एआयसीडब्ल्यूएने दिला आहे.
मुंबईत बॉलिवूड कलाकारांना लक्ष्य करून गोळीबार आणि हल्ल्याच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कलाकारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून त्यांच्या सुरक्षेची खात्री न केल्यास ते चित्रपट उद्योग मुंबईबाहेर हलवण्याचा विचार करू शकतात, असा इशारा दिला आहे.
— IANS (@ians_india) 24 ऑक्टोबर 2026
टायगर श्रॉफवरील हल्ला ही कलाकारांना टार्गेट करण्याची पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक कलाकारांना लक्ष्य करण्यात आले आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. सैफ अली खानवर घरात घुसून चाकू हल्ला झाला. रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेरील गोळीबार झाला. एवढेच नाही तर कपिल शर्माच्या कॅफेवरही हल्ला झाला. 90 च्या दशकातील अंडरवर्ल्डची दहशत पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर पसरत चालल्याची भीती व्यक्त करत गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा व पोलिसांचा धाक उरलेला नाही, असे एआयसीडब्ल्यूएने शहांना पाठवलेल्या पत्रात म्हटले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि जागतिक पातळीवर हिंदुस्थानची प्रतिमा उंचावण्यात बॉलिवूडचे मोठे योगदान आहे. बॉलिवूड इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात कर भरते. मात्र, असे असूनही कलाकार स्वतःला असुरक्षित समजत आहेत. केवळ तोंडी आश्वासने न देता प्रत्यक्ष आणि ठोस सुरक्षा पुरवावी, अशी आक्रमक मागणी आता चित्रपटसृष्टीतून होत आहे. कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास चित्रपटसृष्टीला मुंबईबाहेर हलवण्यासारखा मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा एआयसीडब्ल्यूएने दिला.
Comments are closed.