हैदराबाद विमानतळावर बॉम्ब ठेवण्याची धमकी

सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टचे आदेश

सर्कल संस्था/हैदराबाद

हैदराबादमधील हवाई प्रवास सुरक्षेभोवती अनिश्चितता आणि भीतीचे वातावरण कायम आहे. येथील विमानतळ प्रशासनाला विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा एक निनावी ईमेल मिळाल्यानंतर शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली. येथील विमानतळावर वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणांना अलर्ट रहावे लागत आहे. तसेच प्रवाशांच्या मनातही भीती निर्माण झाली आहे. शनिवारी येथे प्राप्त झालेल्या धमकीनंतरही सुरक्षा यंत्रणेला अतिदक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि विमानतळावर तैनात स्थानिक पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. कोणताही धोका न पत्करता, तात्काळ प्रभावीपणे सुरक्षा प्रोटोकॉल कडक करण्यात आले होते. विमानतळाच्या कानाकोपऱ्यात मुख्य प्रवेशद्वारापासून धावपट्टीपर्यंत सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने विमानतळ परिसर, पार्किंग क्षेत्र आणि टर्मिनलवर संशयास्पद वस्तूंचा बारकाईने शोध घेण्यात आला. मात्र, सुदैवाने कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

Comments are closed.