Bombay HC new Judge Alok Aradhe take oath in Raj Bhavan


तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांनी आज मंगळवारी (ता. 21 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे छोटेखानी शपथविधी सोहळा पार पडला.

मुंबई : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे यांनी आज मंगळवारी (ता. 21 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्या. आराधे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते. (Bombay HC new Judge Alok Aradhe take oath in Raj Bhavan)

या शपथ सोहळ्याच्या सुरुवातीला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्या. आलोक आराधे यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला राष्ट्रगीत व राज्यगीत घेण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीतानेच कार्यक्रमाची सांगता देखील करण्यात आली. न्या. आलोक अराधे यांनी मध्यस्थी व सामंजस्य केंद्रे, न्यायिक अकादमी, तसेच कायदेशीर सेवा प्राधिकरणांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या विविध अंगांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली करण्यात आली आहे. न्यायमूर्ती उपाध्याय यांनी ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदभार स्वीकारला होता, आता सव्वा वर्षाच्या कार्यभारानंतर ते दिल्ली उच्च न्यायालयात पदभार स्वीकारत आहेत.

हेही वाचा… Davos Summit 2025 : दावोसमध्ये गुंतवणूकीत महाराष्ट्र आघाडीवर, आतापर्यंत 10 पेक्षा अधिक सामंजस्य करार

कोण आहेत न्या. आलोक आराधे?

न्या. आलोक अराधे यांचा जन्म 13 एप्रिल 1964 रोजी रायपूर, छत्तीसगड येथे झाला. त्यांनी 12 जुलै 1988 रोजी वकील म्हणून नोंदणी केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात त्यांनी नागरी आणि घटनात्मक प्रकरणांवर काम केले आहे. एप्रिल 2007 मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 29 डिसेंबर 2009 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश व 15 फेब्रुवारी 2011 रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. न्या. आराधे हे 20 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि 11 मे 2018 रोजी हंगामी मुख्य न्यायमूर्ती झाले. 17 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर 03 जुलै 2022 ते 14 ऑक्टोबर 2022 त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. 19 जुलै 2023 रोजी त्यांची तेलंगाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली.



Source link

Comments are closed.