मुंबई विमानतळाची सुरक्षा महत्त्वाची, हायकोर्टाने नाकारली नमाजला परवानगी
मुंबई विमानतळाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने या परिसरात रमजानच्या नमाजला परवानगी देण्यास नकार दिला.
नमाज अदा करणे हा मुस्लिम धर्माचा भाग आहे. आम्ही त्याचा आदर करतो. मात्र नमाज कुठेही अदा करण्याची परवानगी मागितली जाऊ शकत नाही. उद्या तुम्ही ओव्हल मैदानात नमाजसाठी परवानगी मागाल. ते शक्य होणार नाही. मुंबई विमानतळाचा परिसर तर अतिदक्षतेचा आहे. येथील सुरक्षेची तडजोड करता येणार नाही, असेही न्या. बी.पी. कुलाबावाला व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठाने नमूद केले.
काय आहे प्रकरण…
विमानतळ परिसरात एक शेड होती. रमाजानमध्ये तेथे गेली अनेक वर्षे नमाज अदा केली जात होती. ही शेड एमएमआरडीएने गेल्या वर्षी तोडली. परिणामी आता तेथे रमजानचा नमाज अदा करता येत नाही. ही शेड पुन्हा बांधण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून तेथे रमजानचा नमाज अदा करता येईल, अशी मागणी करणारी याचिका सुमारे दोन हजार रिक्षा, टॅक्सी चालकांनी केली होती. वरील निरीक्षण नोंदवत खंडपीठाने ही याचिका फेटाळली.
राज्य शासनाचा दावा
मुंबई विमानतळाला कायम धोका असतो. या परिसरात रमाजनच्या नमाजसाठी तात्पुरती शेड बांधता येणार नाही, असे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले. विमानतळाच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याचा बंद पाकिटातील अहवालही त्यांनी सादर केला.
पर्यायी जागा शोधा
याचिकाकर्त्यांनी मुंबई विमानतळ परिसराचा आग्रह न धरता नमाजसाठी पर्यायी जागा शोधावी. कारण येथे हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. येथून एक किमी अंतरावर मशीद आहे. तेथे नमाज अदा करावी, अशी सूचना न्यायालयाने केली.
Comments are closed.