पुणे बॉम्बस्फोट प्रकरण; दीर्घ तुरुंगवास, खटल्याला विलंबामुळे आरोपीला हायकोर्टाकडून जामीन, 13 वर्षांनंतर सुटका

पुण्यातील जे. एम. रोडवर 2012 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली. 13 वर्षांचा दीर्घ तुरुंगवास तसेच खटल्याला झालेला विलंब पाहता न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने तुरुंगात खितपत पडलेल्या आरोपी फारुख शौकत बागवान याला जामीन मंजूर केला. अन्य आरोपींना जामीन मिळालेला असल्याने समानतेचे तत्त्व बागवान यालाही लागू होते, असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.

1 ऑगस्ट 2012 रोजी पुण्यातील जे. एम. रोडवर पाच बॉम्बस्फोट घडवण्यात आले, तर जंगली महाराज रोडवरील सायकलच्या पॅरिअर बास्केटमध्ये सापडलेला सहावा बॉम्ब निकामी करण्यात आला. या घटनेत एक जण जखमी झाला. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर प्रकरण राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) वर्ग करण्यात आले. याप्रकरणी फारुख शौकत बागवान याला अटक करण्यात आली. त्याने जामिनासाठी हायकोर्टात अॅड. मुबीन सोलकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

राज्य सरकारच्या वतीने आरोपीच्या याचिकेला जोरदार विरोध करण्यात आला. बागवान याने कट रचण्यात सहभाग घेतला होता तर त्याच्या विरोधात स्फोटके कायदा, शस्त्र कायदा, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) व इतर कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

आतापर्यंत 27 साक्षीदारांचीच नोंद

आरोपीच्या वतीने अॅड. मुबीन सोलकर यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. या प्रकरणातील सहआरोपी मुनीब इक्बाल मेमन याला 2024 मध्येच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता तसेच या प्रकरणाव्यतिरिक्त बागवान याच्याविरोधात अन्य कोणताही गुन्हा दाखल नाही. त्याला अटक झाल्यानंतर सुमारे 13  वर्षांहून अधिक काळापासून तो कारागृहात असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर खटल्यातील एकूण 170 साक्षीदारांपैकी आतापर्यंत केवळ 27 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून खटला लवकर निकाली निघण्याची शक्यता फारच धुसर असल्याचे वकिलांनी सांगितले. या युक्तिवादाची दखल घेत खंडपीठाने आरोपीचा जामीन मंजूर केला.

Comments are closed.