Bombay High Court issues notice to Maharashtra Chief Electoral Officer on increased voter turnout
मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजय मिळालेल्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मतदानावर संशय व्यक्त केला. मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर 76 लाख मतदान झाल्याचे दिसत आहे. जर एवढे मतदान झाले असेल तर संध्याकाळनंतर प्रत्येक बुथवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि व्हिडीओ क्लीप द्या, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधी पक्षाने केली आहे. याचसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी युक्तीवाद मांडल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आहे. (Bombay High Court issues notice to Maharashtra Chief Electoral Officer on increased voter turnout)
सुनीवणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जिथे जिथे मतदान केंद्रावरील मत आणि मोजलेले मतांची एकूण संख्या जुळत नाही. ते सर्व प्रकरण निवडणूक आयोगाला पाठवले आहे का? ही गोष्ट निवडणूक आयोगाला पाठवणे गरजेचे आहे का? याची माहिती घ्यावी आणि जर पाठवले नसतील तर जिथे जिथे मतदान केंद्रावरील मतदान आणि मोजणी केलेल्या मतांमध्ये जो फरक आहे. तिथल्या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भात न्यायालयाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही न्यायालयात केली आहे. यानंतर न्यायालयाने नोटीस देत उत्तर देण्यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली आहे. त्यामुळे दोन आठवड्यानंतर पुन्हा हे प्रकरण बोर्डावर येईल अशी परिस्थिती आहे, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नोटीसमध्ये केंद्रावरील मतदान आणि मोजणी केलेल्या मतांमधील फरकाबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे. तसेच याचिकेत जे काही मांडलं आहे, त्याला उत्तर द्यायला सांगितले आहे. न्यायालयाने ही नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाला, दुसरी नोटीस महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रतिनीधी आहेत त्यांना आणि तिसरी नोटीस युनीयन ऑफ इंडिया यांना दिली आहे. तसेच तिघांनाही उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – Maharashtra Kesari 2025 : पंचांच्या चुकीच्या निर्णयावर आता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
प्रकाश आंबडेकर म्हणाले की, सहाच्यानंतर झालेलं मतदान कसं करून घ्यायचं यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली आहेत. त्यानुसार, जेवढी माणसं संध्याकाळी 6 वाजता लाईनमध्ये उभी असतील, त्यातल्या शेवटच्या माणसाला पहिल्या नंबरचा टोकन द्यावा आणि पहिल्या नंबरवर असलेल्या माणसाला प्रोग्रेसीव्ह नंबर देण्यात यावे, अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ती पद्धत लागू केली की नाही, हे तपासण्यासाठी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून माहिती मागितली होती. पण निवडणूक आयोगाने माहिती उपलब्ध नसल्याचे आम्हाला उत्तर दिले. त्यामुळे न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे माहिती उपलब्ध आहे की नाही हे विचारायला सांगितले आहे. तसेच माहिती उपलब्ध नसेल तर संध्याकाळी 6 नंतरच्या मतदाराचं मतदान झालं की नाही, हा त्यातला प्रश्न आहे. आम्ही न्यायालयाला सांगितले आहे की, संध्याकाळी 6 नंतर मतदान झालेलं नाही. त्यावर न्यायालयाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
पारदर्शक निवडणुकीचा दावा आयोगाने न्यायालयासमोर करावा
निवडणूक आयोग वारंवार दावा करतो आहे की, निवडणुका पारदर्शक पार पडल्या. कोणत्याही प्रकारची फेरफार करण्यात आली नाही. यासंदर्भात प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पारदर्शक निवडणुका पार पडल्याचा दावा निवडणूक आयोग करत आहे. तोच दावा त्यांनी न्यायालयासमोर करावा आणि त्यांच्याकडे जी काही माहिती आहे, ती त्यांनी न्यायालयाला द्यावी, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Comments are closed.