नोबेल टॉवरमधील बेकायदा बांधकाम सहा महिन्यांत जमीनदोस्त करा, हायकोर्टाचे पालिकेला आदेश
भायखळ्याच्या नोबेल टॉवरमध्ये पार्किंगच्या जागेत दुकाने आणि निवासी गाळे तसेच रिफ्युजी एरियातही अनधिकृत खोल्या बांधणाऱ्या विकासकाला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नोबेल टॉवरमधील बेकायदा बांधकाम सहा महिन्यांत जमीनदोस्त करा, असे महापालिकेला बजावत इमारत मूळ स्थितीत आणण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
दक्षिण मुंबईतील झाकेरिया मशीद स्ट्रीटवर ‘नोबेल टॉवर’ ही इमारत असून या इमारतीत विकासकाने बेकायदा बांधकामे केली आहेत. या प्रकरणी नदीम खान व इतरांनी नोबेल टॉवर इमारतीतील बेकायदा बांधकामांविरोधात याचिका दाखल करत बिल्डरने मंजूर नकाशाच्या विरोधात जाऊन इमारतीत अनेक बदल केल्याचा आरोप केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी खंडपीठाला सांगण्यात आले की, केवळ रिफ्युजी एरियाच नव्हे तर जिम आणि सोसायटीच्या जागेतही रूम बांधण्यात आल्या आहेत. इमारतीला अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही, तरीही विकासकाने तिथे रहिवाशांना राहण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणी 10 डिसेंबर 2024 रोजी डोंगरी पोलीस ठाण्यात विकासकाविरुद्ध गुन्हासुद्धा नोंदवण्यात आला आहे तसेच 28 फेब्रुवारी 2025 रोजी रहिवाशांना सदनिका रिकाम्या करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. खंडपीठाने या युक्तिवादाची दखल घेत पालिकेला सहा महिन्यांत इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
Comments are closed.