लाच घेणाऱ्या सत्र न्यायाधीशावर अटकेची टांगती तलवार, हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

महिलेकडून लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून सातारा जिल्ह्यातील सत्र न्यायाधीशावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. लाचखोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी धनंजय निकम यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे निकम यांच्या अडचणीत वाढ झाली असून, लाचखोरीच्या गुन्ह्यात त्यांना कोणत्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

निकम हे सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठाने फेटाळून लावला. निकम यांनी फसवणूक प्रकरणात जामीन मंजूर करण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी निकम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपणाला लाचखोरीच्या गुन्ह्यात नाहक गोवण्यात आले असून आपण निर्दोष आहोत, असा युक्तीवाद निकम यांच्यातर्फे जेष्ठ वकील अशोक मुंदारगी यांनी केला. त्यांच्या युक्तीवादावर सरकारी वकील अ‍ॅड. वीरा शिंदे यांनी आक्षेप नोंदवला.

दोन्ही युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती बोरकर यांनी निकम यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला. एसीबीच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील किशोर खरात व सातारा येथील आनंद खरात या दोन आरोपींनी निकम यांच्या सांगण्यावरून जामीन मंजुरीचा आदेश देण्यासाठी एका महिलेकडून 5 लाख रुपयांची मागणी केली. 3 ते 9 डिसेंबर 2024 यादरम्यान केलेल्या चौकशीत लाच मागण्यात आल्याचे उघड झाल्याचे एसीबीने म्हटले आहे.

Comments are closed.