पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणातील मारेकरी सुरक्षा रक्षकाच्या जन्मठेपेवर शिक्कामोर्तब; फाशी सुनावण्यास हायकोर्टाचा नकार

वकील पल्लवी पुरकायस्थ हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सज्जाद मुघल पठाणच्या जन्मठेपेवर उच्च न्यायालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. पठाणला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी सरकारी वकिल आणि पल्लवीच्या कुटुंबियांनी केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला आव्हान देणारे अपिल फेटाळून लावत मारेकऱ्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

पल्लवी पुरकायस्थ हत्येप्रकरणी मारेकरी सुरक्षा रक्षक सज्जाद मुघल पठाणला 2014 मध्ये सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पल्लवीचे वडील आणि राज्य सरकारने या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.

वडाळा येथील हिमालयन हाईट्स इमारतीत 8 ऑगस्ट 2012 ला राहत्या घरी पल्लवी पुरकायस्थची निघृण हत्या करण्यात आली होती. इमारतीचा सुरक्षा रक्षक असलेल्या सज्जादला हत्या विनयभंग आणि ट्रेसपासिंग अंतर्गत सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

2016 साली पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेला सज्जाद पसार झाला होता. अखेर वर्षभराच्या अथक प्रयत्नानंतर मुंबई गुन्हे शाखेने त्याला काश्मीरवरून अटक केली होती. सज्जादला मिळालेली शिक्षा त्याने केलेल्या हत्येच्या अमानुषतेच्या प्रमाणात नसल्याचा अतानू यांचा याचिकेत दावा होता.

Comments are closed.