केंद्रीय कर्मचार्यांसाठी बोनस घोषणा
दिवाळीपूर्वी 6,908 रुपये बोनस मिळणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला. अर्थ मंत्रालयाने यासंबंधीचा आदेश नुकताच जारी केला. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 30 दिवसांचा उत्पादकता-लिंक्ड बोनस (पीएलबी) मंजूर करण्यात आला आहे. गट क आणि नॉन-राजपत्रित गट ब कर्मचाऱ्यांना 2024-25 साठी 30 दिवसांच्या पगाराएवढा तदर्थ बोनस मिळेल. बोनसची रक्कम 6,908 निश्चित करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले.
केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही तदर्थ बोनस उपलब्ध असेल. हा आदेश केंद्र सरकारच्या वेतन पद्धतीचे पालन करणाऱ्या केंद्रशासित प्रदेशातील कर्मचाऱ्यांना देखील लागू होणार आहे. हा बोनस केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना काम केलेल्या महिन्यांच्या संख्येच्या आधारावर प्रमाणानुसार दिला जाईल. सेवेत कोणताही व्यत्यय न आलेले तात्पुरते कर्मचारी देखील या बोनससाठी पात्र असतील. त्यांच्यासाठी वेगळी रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच दिवाळी बोनस जाहीर केला. 24 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा उत्पादकता-लिंक्ड बोनस मंजूर करण्यात आला होता. यासाठी 1,866 कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार असून त्याचा फायदा 10.91 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे.
Comments are closed.