परीक्षण – इतिहासाचे दस्तऐवजीकरण
>> तृप्ती कुलकर्णी
इतिहास केवळ कथांमधून, चरित्रांमधून किंवा बखरींमधूनच जपला जातो, असे नव्हे. तर राजवाडे, गढी आणि गड-किल्लेही आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि संघर्षमय भूतकाळाचा तितक्याच उत्कटतेने मागोवा घेत असतात. पूर्वी किल्ल्यांना वर्चस्व, सुरक्षितता आणि साम्राज्य विस्तार यांची प्रतीके म्हणून फार मोठे महत्त्व होते. हे दुर्ग जपले जात, कधी शत्रूंकडून लुटले जात, तर कधी पुन्हा नव्याने उभे रहात. शिवाजी महाराजांच्या काळातच नव्हे, तर त्यानंतरही अनेक किल्ल्यांनी इतिहास घडवला, जपला आणि बदलला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढय़ शत्रूंना नामोहरम करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यामागे या गड-दुर्गांचे अपरंपार योगदान होते. याच इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणारे इंद्रायणी साहित्य प्रकाशित ‘ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या’ हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. इंडोलॉजीचे अभ्यासक आणि दुर्गप्रेमी संदीप परांजपे यांच्या अखंड दुर्गभ्रमंतीतून साकारलेले हे पुस्तक सातारा आणि कोल्हापूर जिह्यातील अशा एकूण 39 किल्ल्यांच्या नोंदी आपल्या समोर ठेवते. पाचशेहून अधिक किल्ल्यांना भेट दिलेल्या परांजपे यांनी भौगोलिक वैशिष्टय़े, शिलालेखांची वाचने, उंची-अंतरांच्या अचूक नोंदी, मोडी कागदपत्रे आणि विविध बखरींच्या आधारे हे संशोधनपूर्ण लेखन संपादित केले आहे.
परांजपेंनी या पुस्तक संपादनामागचा सांगितलेला महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे देशाच्या सुरक्षिततेत महत्त्वाची भूमिका बजावलेले हे दुर्ग आज दुरावस्थेत आहेत. एकेकाळी देशाचे संरक्षक म्हणून अभिमानाने गौरवले जाणारे हे गडकिल्ले आजमितीला स्वतच्या अस्तित्वासाठीच लढा देत आहेत, ही बाब खरंचच खेदजनक आहे. आज जरी तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या दुर्गांचा फारसा उपयोग नसला तरी या प्रत्येक किल्ल्याचं इतिहासामध्ये एक स्वतचं भौगोलिक, सामाजिक असं अढळ स्थान आहे. त्यामुळे त्यांच्या निर्मितीला स्वतंत्र आणि समृद्ध असा इतिहासही आहे. मात्र हा इतिहास आज सामान्य माणसांसाठी दुर्लभ आहे. त्यामुळे किमान या सगळ्याची कुठेतरी नोंद करण्यासाठी संदीप परांजपे यांनी हा प्रामाणिक आणि उत्तम प्रयत्न केला आहे.
सातारा आणि कोल्हापूर जिह्यात आदिलशाही काळापासून इंग्रजी आमदानीपर्यंत किल्ल्यांना कुणी ताब्यात घेतले, कुणी कोणावर आक्रमणे केली, किल्ल्यांचा उपयोग युद्धकाळात, शांततेच्या काळात, तसेच राजकीय व्यवहारात कसा झाला याचे उल्लेख या पुस्तकात आहेत. त्यावरून किल्ले हे केवळ युद्धासाठीच नव्हे, तर कैद्यांना ठेवणे, संपत्ती-संग्रह, गुप्त माहिती जतन करणे, धार्मिक क्रिया, उत्सव, तसेच रसदसामग्रीच्या व्यवस्थापनासाठीही वापरले जात असल्याचे अनेक नोंदींमधून दिसते.
1750मध्ये महाराणी ताराबाईंनी सातारा किल्ला ताब्यात घेण्याचे केलेले प्रयत्न, चौथे छत्रपती रामराजा यांना तेथे ठेवण्यात आलेली कैद, किल्लेदारांची हत्या, पेशव्यांतील वादात सातारा किल्ल्यासह इतर अकरा किल्ल्यांची मागणी इ. अनेक चित्रविचित्र घटना दुर्गांच्या इतिहासातील गुंतागुंतीचे राजकारण, धर्मकारण आणि समाजकारणही दाखवतात. यावरून हे दुर्ग सत्ता, व्यवहार, राजनिती आणि सुरक्षितता याचीही केंद्रस्थान होते हे स्पष्ट होते. म्हणजेच, गड-किल्ले हे फक्त दगड-मातीची बांधकामे नसून, त्या काळातील सर्वात प्रभावी सुरक्षा यंत्रणा, राजकीय निर्णयकेंद्रे, सांस्कृतिक साठे आणि जनतेचे रक्षक होते. आजच्या आधुनिक संस्था जी कामे करतात… प्रशासन, न्यायदान, रणनीती, आर्थिक व्यवस्थापन ही कामे पूर्वी दुर्गांवर एका छताखाली सुसंघटितपणे होत होती. म्हणूनच या दुर्गांचे आणि त्यांच्या रक्षकांचे ऐतिहासिक योगदान अमूल्य आहे. आणि त्याची जाणीव जपणारी प्रत्येक नोंद हे आपले सांस्कृतिक देणे आहे.
शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की दिवाळीत घराघरांत बांधले जाणारे लहान किल्ले, त्यावर दाखवलेली युद्धनिती, मावळे, तोफा, प्राणी… हे सर्व प्रतीकात्मकरित्या सांभाळताना दुर्गांकडेही तितक्याच आत्मीयतेने बघितले जायला हवे. कारण आज जरी ते शांत उभे असले तरी त्यांच्या दगडांमध्ये अजूनही काळजाचा ठाव, संघर्षाचा प्रतिध्वनी आणि स्वत्वाचा अभिमान दडलेला आहे. या नोंदी त्याच आवाजाला पुन्हा एकदा जागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहेत.
ऐतिहासिक नोंदी दुर्गांच्या
जिल्हे सातारा आणि कोल्हापूर
संपादन : संदीप परांजपे
प्रकाशन : इंद्रायणी साहित्य
किंमत : 450 रु., पृष्ठे : 296
Comments are closed.