लोणावळा, वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी-भाजप लढत, काका-पुतण्या एकत्रः महायुतीला धक्का

लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये मनोमिलन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष एकत्र आल्यामुळे मावळात महायुतीला जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे लोणावळा, वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आमने-सामने आले आहेत. या माध्यमातून काका-पुतण्याने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि मिंधे गटाची राज्यात महायुती आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातील विविध ठिकाणी महायुती फुटल्याचे दिसून येत आहे. याचाच पुढचा अंक म्हणजे लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने शब्द फिरविल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षासोबत आघाडी केली आहे.

तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती झाली आहे. तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी भाजपकडे आणि दुसऱ्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर लोणावळ्यातील नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि दुसऱ्या अडीच वर्षांसाठी भाजपकडे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत ठरले होते. परंतु, तळेगाव दाभाडेमध्ये युती झाली. मात्र, लोणावळ्यात भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी शब्द फिरविला. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. दीड वर्षापूर्वी लोणावळ्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्याला हजर राहू नये, यासाठी आमदार शेळके यांनी दम दिल्याचा आरोप माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी केला होता. त्यावरून शरद पवार यांनी ‘शरद पवार म्हणतात मला, माझ्या वाट्याला कुणी गेले, तर मी त्याला सोडत नाही’, असा इशारा शेळके यांना दिला होता.

भाजपने शब्द फिरविला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा केली. स्थानिक पातळीवर युती म्हणून पुढे जाण्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार युतीसाठी प्रयत्न केले. पण, भाजपने लोणावळ्यात शब्द फिरविला. त्यामुळे लोणावळा, वडगावच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा मिळावा, यासाठी मी स्वतःहून प्रस्ताव दिला होता. त्यावर स्थानिक नेत्यांनी सकारात्मक्ता दाखविली. त्यातून दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. लोणावळा नगरपरिषद, वडगाव पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद मिळत असल्याचे समाधान आहे.

– सुनील शेळके, आमदार, मावळ.

Comments are closed.