तुर्कीविरूद्ध बहिष्कार मोहीम भारतात तीव्र होते
सफरचंद, संगमरवरसह अन्य पदार्थांवर बंदी, ट्रॅव्हल कंपन्यांच्या प्रवास बुकिंगवरही परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल भारतात तुर्कीवर बहिष्कार टाकला जात आहे. प्रवास रद्द करण्याचे प्रमाण वाढले असतानाच तुर्कीतून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवरही ठिकठिकाणी बंदी घातली जात आहे. सफरचंद आणि संगमरवर या दोन मुख्य वस्तूंच्या ऑर्डर्स ठिकठिकाणी रद्द करण्यात आल्या आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने तुर्की आणि अजरबैजानसोबतचा व्यापार संपवण्याची घोषणा केली आहे. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत देशातील 24 राज्यांमधील व्यावसायिक नेते सहभागी झाले होते. भारताच्या विरोधात असलेल्या देशांसोबत व्यवसाय करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले.
22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढल्यानंतर तुर्की-अजरबैजानने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तसेच भारताविरुद्ध वापरण्यासाठी ड्रोन, शस्त्रs आणि प्रशिक्षित लोक पाकिस्तानला पाठवल्यानंतर देशभरात तुर्की आणि अजरबैजानवर बहिष्कार घालण्यास सुरुवात झाली आहे.
भारतात तुर्कीवरील बहिष्काराचे प्रमाण सतत वाढत आहे. ट्रॅव्हल एजन्सी आणि व्यापारी संघटनांनंतर देशातील आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मिंट्रा आणि रिलायन्सच्या मालकीचे अजिओ यांनीही तुर्कीच्या उत्पादनांची विक्री थांबवली आहे. भारतीय ऑनलाईन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मनी सुरक्षा धोके आणि राजकीय तणावाचा हवाला देऊन तुर्की आणि अजरबैजानला प्रवास करण्याविरुद्ध सूचना जारी केल्या आहेत. तसेच भारतातील प्रतिष्ठित विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा करार रद्द केला आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ग्राउंड हँडलिंग सेवांसाठी तुर्की फर्म सेलेबीसोबतची भागीदारी संपुष्टात आणली आहे.
Comments are closed.