खेळाडूंचा बायकॉट, चाहत्यांचा संताप! मीरपूर स्टेडियमबाहेर तोडफोड, बांग्लादेश तापलं; VIDEO VIRAL

बांग्लादेश प्रीमियर लीग (BPL) 2026 च्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आज (15 जानेवारी) पासून सुरू होणाऱ्या बीपीएलचा उद्घाटन सामना राजशाही आणि सिलहट टायटन्स यांच्यात मीरपूर येथील शेर-ए-बांग्ला नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. मात्र सामना सुरू होण्याआधीच तो रद्द करण्यात आला. टॉससाठी पंच मैदानावर आले असतानाही दोन्ही संघांचे कर्णधार मैदानावर न आल्याने सर्वांनाच धक्का बसला.

काही वेळातच स्पष्ट झाले की, लीगमधील सर्व खेळाडूंनी एकत्रितपणे बीपीएलचा बायकॉट केला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) डायरेक्टर नजमुल इस्लाम यांना पदावरून हटवण्यात यावे, या मागणीसाठी खेळाडूंनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. खेळाडूंनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, नजमुल इस्लाम यांना हटवले नाही, तर कोणताही खेळाडू कोणत्याही स्पर्धेत खेळणार नाही.

या घडामोडींमुळे सामना रद्द झाल्याची माहिती मिळताच स्टेडियमबाहेर जमलेल्या चाहत्यांचा संताप अनावर झाला. मीरपूर स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. काही चाहत्यांनी स्टेडियमबाहेर लावलेले पोस्टर फाडले, तर काही जण हातात काठ्या घेऊन घोषणाबाजी करत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. बीपीएल सामना रद्द होणे आणि बीसीबीतील अंतर्गत वाद यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले होते.

दरम्यान, बांग्लादेश क्रिकेटर्स वेलफेअर असोसिएशनने या प्रकरणात ठाम भूमिका घेतली. संघटनेने बीसीबीला स्पष्ट इशारा दिला होता की, नजमुल इस्लाम यांना पदावरून हटवले नाही, तर खेळाडू कोणत्याही लीग किंवा स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. अखेर खेळाडूंच्या दबावापुढे बीसीबीला माघार घ्यावी लागली आणि नजमुल इस्लाम यांना त्यांच्या डायरेक्टरपदावरून हटवण्यात आले.

नजमुल इस्लाम वादात सापडण्यामागे माजी कर्णधार तमीम इक्बाल याच्यावरील वादग्रस्त वक्तव्य कारणीभूत ठरले. आयसीसीकडून सामना वेळापत्रक बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान तमीम याने संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना नजमुल यांनी तमीम याला इंडियन एजंट असे संबोधले होते. या वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर बीपीएल 2026 चे पुढील सामने वेळापत्रकानुसार होणार की नाही, याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे.

Comments are closed.