युद्ध करायला आले, अन् समुद्री चाचे झाले; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प यांना फटकारले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर २०% टोल आकारण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे जगभरात खळबळ निर्माण झाली आहे. तसेच ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा संतप्त झाले आहेत. लुला यांनी ट्रम्प यांच्या या कृतीला समुद्री चाचेगिरी म्हटले आहे. ते इराणविरोधात युद्ध करण्यासाठी आले होते. मात्र, आता ते समुद्री चाचे बनले असल्याचे सांगत त्यांनी ट्रम्प यांना फटकारले आहे.
आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातून जाणाऱ्या जहाजांकडून पैसे घेण्याचा अमेरिकेला कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले. ट्रम्प यांनी घोषणा केली होती की अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संरक्षक म्हणून काम करेल. लुला यांनी यावर ट्रम्प यांना टोला लगावला आहे. प्राचीन काळात याला समुद्री चाचेगिरी म्हटले जायचे, असे ते म्हणाले.
होर्मुझवर नियंत्रण मिळवण्याच्या आणि त्यातून जाणाऱ्या जहाजांवर कर लावण्याच्या अमेरिकेच्या योजनेवर लुला संतप्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांचा हवाला देत त्यांनी अमेरिकेला कडक इशारा दिला. अमेरिकेसारखा एक मोठा आणि महत्त्वाचा देश… आता स्वतःच समुद्री चाचेगिरी करत आहे. ट्रम्प प्रशासन इतरांच्या दुःखातून नफा कमावण्याचा प्रयत्न करत आहे. लुला यांच्या मते, होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय नौकानयनासाठी बऱ्याच काळापासून खुली आहे आणि त्यातून जाणाऱ्या जहाजांना कधीही असा टोल भरावा लागला नाही.
ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, होर्मुझची सामुद्रधुनी इराण असो वा नसो, खुली आहे आणि खुलीच राहील. आम्ही नाकेबंदी पुन्हा लागू करत आहोत, ती केवळ इराणी जहाजे आणि ग्राहकांना आत येण्या-जाण्यापासून प्रतिबंधित करते. इतर सर्व देश या सामुद्रधुनीचा मुक्तपणे आणि मोकळेपणाने वापर करू शकतील, असे ते म्हणाले.
ट्रम्प यांनी पुढे असेही सांगितले की, अमेरिका यापुढे होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संरक्षक म्हणून काम करेल. जगाच्या या अत्यंत अस्थिर भागाला सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेला सर्व खर्च, पाठवलेल्या सर्व मालावर २०% दराने वसूल केला जाईल. ही प्रक्रिया तात्काळ सुरू होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली असून कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.
Comments are closed.