सत्तेत असताना कोटय़वधींचा भ्रष्टाचार अन् मनमानी… निवडणूक हरताच ब्राझीलचे अध्यक्ष अमेरिकेला पळाले; बोल्सोनारो यांच्यासोबत पत्नी अन् दोन मुलीही पसार, सरकारकडून पासपोर्ट जप्त
ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दारुण पराभव होताच उजव्या विचारसरणीचे नेते फ्लाविओ बोल्सोनारो हे देश सोडून पळून गेले आहेत. ते आता अमेरिकेत आश्रय मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांच्या एका सहकाऱयाने दिली आहे. फ्लाविओ हे एकटेच देश सोडून पळून गेले नाहीत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन मुलीही आहेत.
रविवारी पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी त्यांचा दारुण पराभव केला आहे. मतमोजणीच्या दुसऱया फेरीत निकाल जाहीर झाल्यानंतर फ्लाविओ यांना 48 टक्के, तर विजयी झालेल्या लुला यांना 52 टक्के मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत कोणालाही 50 टक्के मते मिळाली नव्हती. फ्लाविओ यांना सोमवारी ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने 24 तासांच्या आत पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार, मनी लॉण्डरिंग आणि करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. तपास टाळण्यासाठी ते देश सोडून जाऊ शकतात, अशी पोलिसांना भीती होती. मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत फ्लाविओ यांनी पासपोर्ट जमा केले नाहीत. पोलिसांना त्यांनी देश सोडून पळ काढल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत पासपोर्ट जमा न झाल्याने अधिकाऱयांनी त्यांचे पासपोर्ट रद्द केले.
भ्रष्टाचार भोवणार
फ्लावियोविरोधात भ्रष्टाचार, मनी लॉण्डरिंग आणि करचुकवेगिरीसह अनेक प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. तसेच त्यांच्या वडिलांच्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी पैसे उभारण्याशी संबंधित प्रकरणाचाही यात समावेश आहे. चित्रपटासाठी माजी बँकर डॅनियल वोरकारोकडून सुमारे 1.2 कोटी डॉलर उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, असा त्यांच्यावर आरोप आहे.
अर्जेंटिनामार्गे अमेरिकेत
फ्लावियो हे अर्जेंटिनामार्गे अमेरिकेत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. अर्जेंटिनात त्यांचे निकटवर्तीय आणि दक्षिणपंथी राष्ट्राध्यक्ष झेवियर मिलेई यांचे सरकार आहे. फ्लाविओच्या देशात प्रवेशाची कोणतीही नोंद नाही, असे अर्जेंटिनाच्या सरकारने सांगितले तर फ्लाविओ कोणत्याही अधिकृत सीमा तपासणी नाक्यावरून देशाबाहेर गेलेले नाहीत, असे ब्राझीलच्या पोलिसांचे म्हणणे आहे.
Comments are closed.