चालकाने नशा केली तर गाडी सुरूच होणार नाही; एसटीच्या नवीन बसगाडय़ांत ‘ब्रेथ अॅनालायझर’ बसवणार

मद्यपी चालकाने एसटी चालवू नये यासाठी महामंडळाच्या नवीन 5000 गाडय़ांमध्ये ‘ब्रेथ अॅनालायझर’ बसवण्यात येणार आहे. चालक दारू प्यायला असेल तर त्याच्या हातून गाडी सुरूच होणार नाही. तसेच चालकाच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने मद्यपी चालकावर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन 5000 गाडय़ांची भर पडणार आहे. त्यापैकी 400 गाडय़ा चालू महिन्यात दाखल झाल्या असून अजून 3000 नवीन गाडय़ा येणार आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या आणि नजीकच्या काळात येणाऱ्या सर्व 5000 गाडय़ांमध्ये ब्रेथ अॅनालायझर बसवण्यात येणार आहे. चालकाच्या सीटसमोर ब्रेथ अॅनालायझर बसवले जाईल. त्याद्वारे चालकाने नशा केली आहे का, याची तपासणी केली जाईल. चालकाला एसटीचे स्टेअरिंग हाती घेण्यापूर्वी ब्रेथ अॅनालायझरच्या यंत्रापुढे फुंकर मारावी लागणार आहे. चालक दारू प्यायला असेल तर ते त्याचवेळी उघड होईल. त्या चालकाच्या हातून बसचा स्टार्टर लागणार नाही, अशी माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. संबंधित मद्यपी चालकाला तेथूनच घरी पाठवले जाईल, त्याची त्यादिवशी कामावर दांडी लागेल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 
			 
											
Comments are closed.