राजस्थानमध्ये लाच घेणार्या आमदाराला अटक करण्यात आली
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत भारत आदिवासी पक्षाचे (बीएपी) आमदार जयकृष्ण पटेल यांना 20 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक केली आहे. राजस्थानच्या राजकारणात पहिल्यांदाच ‘एसीबी’ने एका आमदाराला पकडले आहे. हे प्रकरण 20 लाख रुपयांच्या लाचेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. आमदाराने आपल्या गनमॅनमार्फत हा आर्थिक व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आमदाराने लाच घेतल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तक्रारदाराकडून याप्रकरणी एसीबीला अलिकडेच तक्रार मिळाल्याची माहिती मिळाली होती. आमदार आपल्या कंपनीला काम करू देत नसल्याची तक्रार संबंधिताकडून करण्यात आली होती. काम करू देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केली जात होती. अडीच कोटी रुपयांची लाच देऊन काम करण्यास परवानगी देण्याचा करार करण्यात आला होता. यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचत रविवारी आमदाराच्या सरकारी निवासस्थानातून लाचखोरीचा घोटाळा उघडकीस आणला. मिळालेल्या माहितीनुसार, आमदाराच्या गनमनमार्फत लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये स्वीकारले जात असताना कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
Comments are closed.