सत्यांडर जैनविरूद्ध लाचखोरी प्रकरणात नोंदणीकृत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंदर जैन यांच्या विरोधात दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेने 7 कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा नोंद केला आहे. सत्येंदर जैन हे आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात दिल्लीचे सार्वजनिक काम विभागाचे मंत्री होते.

त्यांच्या कार्यकाळात दिल्लीत मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही बसविण्याची योजना करण्यात आली होती. दिल्लीतील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा उद्देश होता, असे त्यावेळच्या राज्य सरकाराने स्पष्ट केले होते. ही योजना 571 कोटी रुपयांची होती. हे कंत्राट भारत इलेक्ट्रॉनिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला देण्यात आले होते. हे काम या कंपनीला देण्याच्या मोबदल्यात सत्येंदर जैन यांनी 7 कोटी रुपयांची लाच घेतल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीने हे काम स्वीकारले, पण, ते पूर्वनिर्धारित वेळेत केले नाही. कंपनीने काम पूर्ण करण्यासाठी प्रदीर्घ वेळ घेतला असूनही त्याच कंपनीला सत्येंदर जैन यांच्या सूचनेवरुन पुढची कंत्राटे देण्यात आली. या प्रकरणात 7 कोटी रुपयांची लाच सत्येंदर जैन यांनी स्वीकारली, असा हा आरोप आहे.

भाजपचा आरोप

या सीसीटीव्ही घोटाळ्यात केवळ सत्येंदर जैन यांचाच सहभाग नाही, तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या घोटाळ्यात सहभागी आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवाल यांच्यावर टिप्पणी केली असून ते या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

आरोप फेटाळले

आम आदमी पक्षाने सत्येंदर जैन यांच्यावरचे आरोप फेटाळले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार आमच्या पक्षाच्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई करत आहे. जैन यांच्याविरोधात खोटी प्रकरणे सादर करुन त्यांचे राजकीय भविष्य संपविण्याचा प्रयत्न हा पक्ष करीत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन आम आदमी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा प्रत्यारोप या पक्षाने केला.

Comments are closed.