चिपळूणमध्ये पिंपळी नदीवरील पूल खचला, दसपटीकडे जाणारी वाहतूक ठप्प

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागाला जोडणारा आणि प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 23 वरील पिंपळी – नांदिवसे रस्त्यावरील नदीवरील पूल काल अचानक खचला. त्यामुळे दसपटीकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. हा पूल सन 1965 साली बांधण्यात आला होता.
पिंपळी गाणे – खडपोली एम.आय.डी.सी.ला जोडणाऱ्या या पुलाच्या काही भागात तडे गेल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांना माहिती दिली. घटनास्थळी उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे व त्यांचे सहकारी पोहचले. त्यांनी तात्काळ पाहणी करून पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.
वाहतूक बंद झाल्यामुळे दसपटी विभागाकडे जाणाऱ्या प्रवासी व वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळी – पेढाबे फाटा – खडपोली हा मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे. पुलाच्या खचण्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे.
Comments are closed.