प्रिन्स अॅण्ड्रय़ू यांना अटक; एपस्टीन फाईल्सने ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ, नो क्लीन चिट… याला म्हणतात कायद्याचे राज्य
जगातील अनेक देशांतील सत्ता सिंहासनांना हादरे देणाऱ्या एपस्टीन फाईल्समुळे ब्रिटनच्या राजघराण्यात वादळ आले आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार एपस्टीनशी संबंध आणि बलात्काराच्या आरोपांत अडकलेले ब्रिटनचे माजी प्रिन्स अॅण्ड्रय़ू यांना आज अटक करण्यात आली. वाढदिवशीच पोलिसांनी त्यांना घरातून ताब्यात घेतले. ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्याला पहिल्यांदाच अटक झाली असून या अटकेमुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.
हिंदुस्थानात एपस्टीन फाईल्सवरून विरोधक सातत्याने आरोप करत आहेत. मात्र सरकारकडून याची दखलही घेतली जात नाही. त्या पार्श्वभूमीवर अॅण्ड्रय़ू यांच्यावरील कारवाईचे कौतुक होत आहे. राजघराण्यातील व्यक्ती असूनही कायद्यापुढे सगळे समान, नो क्लीन चिट असा खाक्या ब्रिटिश सरकारने दाखवला. त्यावर ‘याला म्हणतात कायद्याचे राज्य,’ अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमात उमटली.
अॅण्ड्रय़ूवर आरोप करणारी व्हर्जिनिया गिफ्रे हिने एप्रिल 2025 मध्ये आत्महत्या केली होती. ‘नो बॉडीज गर्ल’ या आत्मचरित्रातून तिने स्वतःवर झालेल्या अत्याचाराचा व तस्करीचा भंडाफोड केला होता. त्यानुसार वयाच्या 15व्या वर्षी ती एपस्टीनच्या जाळय़ात अडकली होती. एपस्टीनने तिला अनेक हायप्रोफाईल व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते.
कायदा त्याचे काम करेल! – किंग चार्ल्स
अॅण्ड्रय़ू यांच्या अटकेवर ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या प्रकरणाची योग्य पद्धतीने आणि योग्य अधिकाऱ्यांकडून पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी होईल. चौकशीला आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य असेल. कायदा त्याचे काम करेल,’ असे चार्ल्स यांनी स्पष्ट केले.
लैंगिक शोषणाचा आरोप
एपस्टीन प्रकरणातील पीडित व्हर्जिनिया गिफ्रे हिने अॅण्ड्रय़ू यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. व्हर्जिनिया अवघी 17 वर्षांची असताना तीन वेळा अॅण्ड्रय़ू यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. पहिल्या वेळी लंडन येथे एपस्टीनची प्रेयसी गिसलेन मॅक्सवेल हिच्या घरी, दुसऱ्यांदा न्यूयॉर्क येथील एपस्टीनच्या बंगल्यावर आणि तिसऱ्यांदा एपस्टीनच्या पॅरेबियन बेटावर अॅण्ड्रय़ू यांनी व्हर्जिनियाशी संबंध ठेवले होते. हे सगळे घडले त्यावेळी अॅण्ड्रय़ू हे ब्रिटनचे वाणिज्य दूत होते. त्याचवेळी त्यांचा एपस्टीनशी संबंध आला होता. आरोपांनंतर त्यांनी राजीनामाही दिला होता.
जन्मठेप होऊ शकते
एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यानंतर एखाद्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अॅण्ड्रय़ू हे दिवंगत महाराणी एलिझाबेथ यांचे दुसरे पुत्र असून राजे किंग चार्ल्स यांचे धाकटे बंधू आहेत. सार्वजनिक पदावर असताना चुकीचे वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यास अॅण्ड्रय़ू यांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
राजवाडय़ातूनही हाकलले
किंग चार्ल्स यांनी गेल्या वर्षी अॅण्ड्रय़ू यांची ‘युवराज’ ही उपाधी व इतर शाही मानमरातब काढून घेतले होते. विंडसर येथील शाही निवासस्थान ‘रॉयल लॉज’मधूनही त्यांना हाकलण्यात आले होते. 2015 मध्ये व्हर्जिनिया हिने त्यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर 2021 मध्ये त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा खटला दाखल झाला. हे प्रकरण सुमारे 125 कोटी रुपयांमध्ये तडजोड करून मिटवण्यात आले, मात्र अॅण्ड्रय़ू यांनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिला होता.
Comments are closed.